पॅरिस; वृत्तसंस्था : फ्रान्सचे पंतप्रधान सेबेस्टियन लेकोर्नु यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोमवारी त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली होती. ही घोषणा केल्याच्या काही तासांनंतरच त्यांनी राजीनामा देण्याचे जाहीर केले. त्यांना गेल्या महिन्यातच फ्रान्सच्या पंतप्रधानपदी नियुक्त करण्यात आले होते.
सेबेस्टियन यांच्या या अचानक राजीनाम्यामुळे फ्रान्समध्ये सध्या सुरू असलेली राजकीय अस्थिरता आणखी तीव्र झाली आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमोर आता एका वर्षाच्या आत आपला पाचवा पंतप्रधान शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, साने ताकाईची यांची जपानची पहिली महिला पंतप्रधान म्हणून निवड होण्याचा मार्ग या नाट्यमय घडामोडीनंतर मोकळा झाला.
विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केल्याच्या अवघ्या 12 तासांच्या आतच आपल्या पदाचा राजीनामा दिला.
फ्रान्समध्ये सध्या राजकीय संकट सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी गेल्या महिन्यात फ्रांस्वा बायरू यांना अविश्वास ठरावाद्वारे पदावरून हटवले होते. त्यानंतर त्यांनी लेकोर्नु यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती. बायरू यांच्या आधीचे पंतप्रधान मिशेल बार्नियर यांनाही अविश्वास ठरावाद्वारेच पदावरून दूर करण्यात आले होते.