आंतरराष्ट्रीय

पंतप्रधान जॉन्सन यांची ब्रेक्झिट करारावर सही

Pudhari News

लंडन : वृत्तसंस्था 

युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी 28 देशांच्या युरोपियन महासंघातून (ईयू) बाहेर पडण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. देशासाठी हा खूप चांगला क्षण आहे, असे जॉन्सन यावेळी म्हणाले. 31 जानेवारीपर्यंत बे्रक्झिटची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. 

एक दिवस आधीच युरोपियन युनियनच्या नेत्यांनी ब्रिटनला ईयूमधून बाहेर करण्याच्या दस्तऐवजांवर स्वाक्षर्‍या केल्या होत्या. आता 29 जानेवारीला ब्रिटिश संसदेत ब्रेक्झिटविषयी चर्चा आणि मतदान होईल. युरोपच्या संसदेतही याच दिवशी यूकेला ईयूमधून बाहेर करण्यासाठी मतदान होणार आहे. तथापि, हे केवळ प्रतीकात्मक आहे. युरोपचे बहुतांश नेते यूकेला ईयूमधून बाहेर करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. 2016 मध्ये ब्रिटनने 28 देशांच्या युरोपियन महासंघातून वेगळे होण्यासाठी ब्रेक्झिटची घोषणा केली होती. 

बेल्जियमच्या ब्रुसेल्स येथे करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर युरोपीयन महासंघतर्फे हे दस्तऐवज रेल्वेदारे पंतप्रधान जॉन्सन यांच्याकडे पोहोचवले गेले. या वेळी बेल्जियमचे माजी पंतप्रधान आणि ईयू समिटचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल म्हणाले की, ब्रिटन ईयूमधून बाहेर पडल्याने आमचे नाते बदलले; मात्र आमच्यातील मैत्री कायम राहील. आम्ही लवकरच नवीन सहकारी आणि मित्रराष्ट्र म्हणून काम करू. 

ब्रेक्झिटमुळे ब्रिटिश अर्थव्यवस्थेला 18.9 लाख कोटींचे होण्याची नुकसान शक्यता आहे. 

पुढे काय?

31 जानेवारीनंतर 11 महिन्यांच्या ट्रांझिशन पीरियडमध्ये ब्रिटन युरोपीयन महासंघाचा सदस्य नसेल; पण महासंघाच्या नियमांचे पालन करेल आणि बजेटमध्येही योगदान देईल. ब्रिटन आणि महासंघ व्यापार करारांसह भविष्यातील संबंधांबाबत चर्चा करू शकतील, यासाठी हा कालावधी यासाठी देण्यात आला आहे. हा कालावधी 1 फेब्रुवारीपासून सुरू होईल.

SCROLL FOR NEXT