बीजिंग; वृत्तसंस्था : चीनमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी लष्करामधील भ्रष्टाचारविरोधात मोठी कारवाई करत दोन उच्चपदस्थ लष्करी अधिकार्यांना कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी केली आहे. यामध्ये सेंट्रल मिलिटरी कमिशनचे (सीएमसी) उपाध्यक्ष आणि पॉलिट ब्युरोचे सदस्य हे वेईडोंग यांचा समावेश आहे. ही कारवाई कम्युनिस्ट पक्षाच्या आगामी महत्त्वाच्या बैठकीच्या काही दिवस आधी करण्यात आली आहे.
या सर्व नऊ अधिकार्यांवर गंभीर गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या शुद्धीकरणाची सुरुवात चायनीज रॉकेट फोर्समधून झाली होती. तिथल्या भ्रष्टाचारामुळे क्षेपणास्त्रांची क्षमता कमी झाली असल्याचे बोलले जाते. त्यानंतर ही मोहीम लष्कर, नौदल, हवाईदल आणि अवकाश उद्योगापर्यंत पोहोचली आहे. गेल्या काही महिन्यांत दोन माजी संरक्षणमंत्री आणि अनेक वरिष्ठ अधिकारी या मोहिमेच्या टप्प्यांत निष्कासित झाले आहेत.
या कारवाईमुळे कम्युनिस्ट पक्षाच्या फोर्थ प्लेनम बैठकीपूर्वी खळबळजनक राजकीय वातावरण तयार झाले आहे. या बैठकीमध्ये चीनच्या आगामी आर्थिक धोरणांची चर्चा होणार आहे, तसेच वरिष्ठ पदांवर नवीन नियुक्त्या होण्याची शक्यता आहे. हे आणि मिआओ यांच्या जागी नव्या नियुक्त्यांची घोषणा यावेळी होऊ शकते.
हे वेईडोंग हे 1967 नंतर हटवले गेलेले पहिले पोशाखधारी (युनिफॉर्ममध्ये) उपाध्यक्ष आहेत. याआधी हे लाँग यांना माओ झेडोंगच्या काळात काढण्यात आले होते. ही मोहीम माओच्या काळानंतरची सर्वात मोठी लष्करी शुद्धीकरण मोहीम असल्याचे मानले जात आहे.
हे वेईडोंग हे शी जिनपिंग यांच्या थेट नेतृत्वाखाली असलेल्या सीएमसीच्या दोन उपाध्यक्षांपैकी एक होते. ते पॉलिट ब्युरोचे सदस्य देखील होते. म्हणजेच कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च निर्णय घेणार्या मंडळात त्यांचा समावेश होता. 2017 नंतर पॉलिट ब्युरोमधून काढले गेलेले ते पहिलेच सदस्य आहेत. याआधी चोंगकिंगचे माजी पक्षप्रमुख सन झेंगकाय यांना पदावरून काढण्यात आले होते.
या मोठ्या लष्करी झटक्यात एकूण नऊ वरिष्ठ लष्करी अधिकारी निष्कासित करण्यात आले असून त्यांच्यावर पक्षशिस्तीचे गंभीर उल्लंघन आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असे आरोप आहेत. त्यात खालील अधिकार्यांचा समावेश आहे -
* सीएमसीचे माजी राजकीय आयुक्त मिआओ हुआ
* सीएमसी राजकीय कामकाज विभागाचे माजी कार्यकारी उपसंचालक हे होंगजुन
* सीएमसीचे संयुक्त ऑपरेशन्स कमांडलिन माजी कार्यकारी उपसंचालक वांग शिऊबिन
* ईस्टर्न थिएटर कमांडचे माजी कमांडर लिन झिआंगयांग
* ग्राऊंड फोर्स माजी राजकीय आयुक्त छिन शुतोंग
* नेव्हीचे माजी राजकीय आयुक्त युआन हुआझी
* रॉकेट फोर्सचे माजी कमांडर वांग होऊबिन
* सशस्त्र पोलिस दलाचे माजी कमांडर वांग चूननिंग