आंतरराष्ट्रीय

स्वित्झर्लंडमध्ये बुरखाबंदीची तयारी | पुढारी

Pudhari News

बर्न :

युरोपातील फ्रान्स, ऑस्ट्रिया, नेदरलँड, डेन्मार्क आणि बेल्जियमपाठोपाठ आता स्वित्झर्लंडमध्येही बुरखाबंदीची तयारी सुरू झाली आहे. रविवारी याबाबत जनमत घेण्यात आले. यात 51.21 टक्के नागरिकांनी बुरखाबंदीच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे आता असा कायदा बनविला जाऊ शकतो. 

महिनाभरापूर्वी तसा प्रस्ताव आणला होता; पण लोकांच्या विरोधानंतर सरकारने जनमत घेण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, बुरखाबंदीचा कायदा झाल्यानंतर महिलांना सार्वजनिक ठिकाणी चेहरा पूर्णतः झाकता येणार नाही. 

स्विस पीपल्स पार्टीसह अन्य पक्षांनी आपल्या प्रस्तावात कुठेही इस्लाम शब्दाचा उल्लेख केलेला नव्हता. तथापि, काही घटकांनी  ही बुरखाबंदी असून, इस्लामविरोधी असल्याचे म्हटले आहे. स्वित्झर्लंडची लोकसंख्या साधारण 86 लाख असून, यातील 5.2 टक्के लोक मुस्लिम आहेत. दरम्यान, देशातील सार्वजनिक ठिकाणी महिलांना बुरखाबंदी असेल. मात्र, ती धार्मिक स्थळांवर नसेल. आजार रोखले जावेत तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव महिलांना बुरखा वापरता येईल. ज्या कार्निव्हलमध्ये बुरख्याची परंपरा असेल, तिथे बुरख्यास बंदी नसेल. या प्रस्तावात परदेशी प्रवासी आणि अन्य लोकांनाही सूट नाही. या वर्षाच्या सुरुवातीलाच स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या सर्व्हेनुसार येथील 30 टक्के महिला हिजाब किंवा नकाब घालत असल्याचे समोर आले होते.  

अधिक वाचा : पेट्रोल, डिझेलवरील करात कपात नाही

धार्मिक गटांचा विरोध 

मात्र स्वित्झर्लंडच्या संसदेने आणि देशातील सरकारने तयार केलेल्या सात सदस्यीय कार्यकारी परिषदेने या जनमत चाचणीमधील मतदानाला विरोध करत बंदीचा निर्णय अयोग्य असल्याचे म्हटले आहे. तसेच स्वित्झर्लंडमधील सर्व धार्मिक गटांचे नेतृत्व करणार्‍या संस्थेने विरोध केला आहे. 

युरोपातील या देशांतही बंदी

फ्रान्सने 2011 मध्ये चेहरा पूर्ण झाकण्यावर बंदी आणली होती. यासह डेन्मार्क, ऑस्ट्रिया, नेदरलँड आणि बल्गेरिया येथेही सार्वजनिक ठिकाणी बुरखाबंदी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT