पुढारी ऑनलाईन डेस्क :
ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस हे उजव्या हातावर पडल्याने किरकोळ जखमी झाले आहेत. पण त्यांच्या हाताला काणत्याही प्रकारचे फॅक्चर झाले नसल्याचे व्हॅटिकन सिटीने म्हटले आहे. याबाबातचे वृत्त सीएनएन ने दिले आहे.
याबाबत व्हॅटिकन सिटीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ८८ वर्षीय पोप फ्रान्सिस मंगळवारी सकाळी ‘कासा सान्टा मार्टा’ या पोप यांच्या अधिकृत निवासस्थानी तोल जाऊन उजव्या हातावर पडले. पण त्यांच्या हाताला काणतेही फॅक्चर नाही पण किरकोळ दुखापत झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचा हात स्थिर राहण्यासाठी बांधला आहे.
हातावर पडल्यानंतर ही पोप फ्रान्सिस यांनी पाच बैठका घेतल्या. व्हॅटिकन सिटीने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रात पोप यांचा उजवा हात बांधलेला दिसत आहे. गेल्या काही आठवड्यात पोप हे दुसऱ्यांदा पडले आहेत. डिसेंबरमध्ये पडल्याने त्यांच्या हनुवटीला जखम झाली होती. ८८ वय असल्याने सध्या पोप यांना अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत.
गुडघे दूखत असल्याने २०२२ पासून पोप हे व्हिलचेअरचा वापर करत आहेत. ‘आपल्याला ही गोष्ट खूपच लाजीरवाणी वाटते पण म्हातारपण ते जसे आहे तसे स्वीकारले पाहिजे.’ अशी कबूलीही त्यांनी दिली आहे.