Pope Francis funeral
व्हॅटिकन सिटी : मानवतेचा पूजारी अशी जगभरात ओळख निर्माण केलेले कॅथोलिक ख्रिश्चन धर्मगुरु पोप फ्रान्सिस (वय ८८) याचे २१ एप्रिल रोजी निधन झाले होते. त्यांच्यावर आज (दि.२६) व्हॅटिकनमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. जगभरातील लाखो भाविक, धर्मगुरू, राष्ट्रप्रमुख आणि राजघराण्यांतील व्यक्ती आज पोप फ्रान्सिस यांना अंतिम श्रद्धांजली वाहतील. व्हॅटिकनमध्येच दफन करण्याची अनेक दशकांची परंपरा बाजूला ठेवून त्यांच्यावर व्हॅटिकनच्या बाहेर काही अंतरावर बॅसिलिकामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
शतकानुशतके जुन्या परंपरेला फाटा देत पोप यांना बॅसिलिका दी सांता मारिया मॅगिओरमध्ये दफन केले जाईल. कारण पोप फ्रान्सिस यांनी रोमच्या सांता मारिया बॅसिलिकामध्ये आपल्याला दफन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. याआधीच्या पोप यांना व्हॅटिकनच्या हद्दीत सेंट पीटर बॅसिलिका जवळ दफन करण्यात आले होते.
पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारासाठीची प्रार्थना ( funeral mass) स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता) सुरू होईल. ती सकाळी ११:४५ वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी ३:१५ वाजता) संपणार आहे.
गेल्या तीन दिवसांत शुक्रवारपर्यंत व्हॅटिकनमध्ये अडीच लाखाहून अधिक भाविकांनी पोप यांचे अंत्यदर्शन घेतले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स विल्यम, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, स्पेनचे राजा फेलिप आणि राणी लेटिजिया आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा आणि इतर मिळून ५४ देशांचे राष्ट्रप्रमुख आणि १२ राजघराण्यांतील व्यक्ती ह्या पोप यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र येणार आहेत.
नम्र स्वभाव आणि गरीब, उपेक्षितांविषयी असलेल्या कनवाळूपणामुळे त्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. पोप फ्रान्सिस हे २६६वे पोप होते. ते अमेरिका खंडातून निवड झालेले पहिले तर पोप ग्रेगरी तिसऱ्यानंतर (इ.स. ७३१-७३४) पोपपदी येणारे पहिले युरोपाबाहेरचे पुरुष होते. २०२२ मध्ये त्यांनी कॅनडाला भेट दिली. त्यांनी स्थानिक लोकांची चर्चने केलेल्या अत्याचारांबद्दल माफी मागितली होती.