लंडन; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धात पोलंडने आपल्या हवाई हद्दीत प्रवेश केलेले रशियन ड्रोन पाडले. ‘नाटो’ सदस्य देशाने रशियाविरोधात थेट कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. युक्रेनवरील मोठ्या हवाई हल्ल्यादरम्यान 19 हून अधिक रशियन ड्रोन पोलंडच्या हवाई हद्दीत घुसल्याचा दावा पोलंडने केला आहे. पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी सांगितले की, त्यांनी ‘नाटो’ कराराच्या कलम 4 चा वापर केला असून, त्यामुळे सदस्य देश त्यांच्या सहयोगींसोबत सल्लामसलत करू शकतात.
‘नाटो’च्या सदस्य देशाने रशियाविरोधात केलेली ही पहिलीच थेट कारवाई
पोलंडने ‘नाटो’ करारानुसार मित्रराष्ट्रांशी सल्लामसलत
युरोपमधील तणाव वाढला; रशियावर अधिक निर्बंधांची मागणी
रशियाने या आरोपांना बिनबुडाचे म्हटले असून, ड्रोन रशियन असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे म्हटले आहे. मात्र, ‘नाटो’ राष्ट्रांनी हे आक्रमण हेतूपुरस्सर असल्याचा दावा केल्याने याचे गांभीर्य वाढले आहे. या घटनेनंतर पोलंडच्या पूर्व भागातील तीन प्रांतांमध्ये रहिवाशांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. ‘नाटो’ आणि पोलंडच्या संयुक्त कारवाईत ‘एफ-16’, ‘एफ-35’ आणि ‘एडब्ल्यूएसीएस’सारखी विमाने वापरण्यात आली.
पोलंडचे पंतप्रधान टस्क यांनी या घटनेला मोठे आव्हान म्हटले आहे. या घटनेमुळे रशियावर कठोर निर्बंध लादण्याच्या चर्चेला वेग आला आहे. तसेच, युक्रेनला अधिक मदत करण्याची मागणीही जोर धरत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाने 415 ड्रोन आणि 40 क्षेपणास्त्रे वापरली, ज्यात किमान 8 इराणी ‘शाहिद’ ड्रोन पोलंडच्या दिशेने पाठवले होते. यामुळे युरोपसाठी हा एक अत्यंत धोकादायक प्रसंग असल्याचे त्यांनी नमूद केले.