pnb scam mehul choksi:
तब्बल १३ हजार ५०० कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सी याला भारतात प्रत्यार्पित करण्याच्या प्रक्रियेत भारताला मोठे यश मिळाले आहे. बेल्जियममधील अँटवर्प कोर्टाने (Antwerp Court) चोक्सीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली असून, त्याची अटकही वैध ठरवली आहे.
एप्रिलमध्ये बेल्जियम पोलिसांनी मेहुल चोक्सीला अटक केली होती. हजारो कोटींचा घोटाळा करून तो अनेक वर्षांपासून परदेशात फरार होता. भारताने बेल्जियम कोर्टाकडे चोक्सीच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती आणि ही मागणी आता कोर्टाने मान्य केली आहे.
अटक वैध :
अँटवर्प कोर्टाने ६५ वर्षीय मेहुल चोक्सीची सध्याची अटक वैध ठरवली आहे.
भारताची मागणी :
भारताने चोक्सीवर दंडसंहिता आणि भ्रष्टाचार कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तुरुंग व्यवस्था :
भारताच्या वकिलांनी बेल्जियम कोर्टाला माहिती दिली की, प्रत्यार्पणानंतर चोक्सीला मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातील बॅरेक नंबर १२ मध्ये ठेवले जाईल आणि त्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे.
अपील करण्याची संधी :
कोर्टाच्या या निर्णयाविरोधात चोक्सीकडे अजूनही अपील करण्याची संधी उपलब्ध आहे.
पीएनबी घोटाळ्यामध्ये हजारो लोकांची फसवणूक करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप मेहुल चोक्सीवर आहे. बेल्जियम कोर्टाने प्रत्यार्पणाला मंजुरी दिल्याने, तो लवकरच भारतीय कायद्याच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे. त्याचे प्रत्यक्ष प्रत्यार्पण कधी होते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.