Narendra Modi Norway honour | पंतप्रधान मोदींना नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान 
आंतरराष्ट्रीय

Narendra Modi Norway honour | पंतप्रधान मोदींना नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान

‘ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट’ पुरस्काराने गौरव

पुढारी वृत्तसेवा

ओस्लो; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट’ प्रदान करण्यात आला. नॉर्वेचे राजा हाराल्ड पाचवे यांनी ओस्लो येथे झालेल्या विशेष समारंभात मोदी यांना या सन्मानाने गौरविले. मोदी यांना मिळालेला हा 32 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार ठरला आहे. यापूर्वी स्वीडननेही त्यांना सर्वोच्च सन्मानाने गौरविले होते.

नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे मोदी यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोर यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भारत आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन (ईएफटीए) देशांमधील व्यापार व आर्थिक भागीदारी कराराचा उल्लेख करत पुढील 15 वर्षांत भारतात 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणि 10 लाख रोजगारनिर्मितीचे लक्ष्य निश्चित केल्याची माहिती दिली. भारत-नॉर्वे व्यापार सध्या सुमारे 2.73 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला असून, नॉर्वेच्या सरकारी वेल्थ फंडाने भारतीय बाजारात सुमारे 28 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. भारत आणि संपूर्ण नॉर्डिक प्रदेशातील व्यापार जवळपास 19 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले.

मोदी म्हणाले की, भारत-नॉर्वे यांच्यातील भागीदारी ही केवळ व्यापारापुरती मर्यादित नसून हरित ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, संरक्षण, हवामान बदल आणि समुद्री सुरक्षेसारख्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देश एकत्र काम करणार आहेत. दोन्ही देश नियमाधारित जागतिक व्यवस्थेवर, संवाद आणि कूटनीतीवर विश्वास ठेवणारे आहेत.

पहलगामवेळी पाठिंब्यासाठी आभार

युक्रेन आणि पश्चिम आशियातील संघर्षांचा उल्लेख करत मोदी यांनी युद्धाचा मार्ग हा कायमस्वरूपी समाधान देऊ शकत नाही. संवाद आणि राजनैतिक मार्गानेच जागतिक संघर्ष सोडवले जाऊ शकतात. बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत बदल आवश्यक आहे, असे ते म्हणाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी नॉर्वेचे आभार मानले. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा समूळ नाश करणे ही भारत आणि नॉर्वेची समान बांधिलकी असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मोदींनी स्वीडनमध्ये रविवारी गोथेनबर्ग येथे ‘युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्री’ परिषदेला संबोधित केले. मोदी यांनी स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टेर्सन तसेच युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वोन डेर लेयेन यांची भेट घेतली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर स्वीडनने भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल भारत कृतज्ञ आहे. स्वीडिश कंपन्या भारतात उत्पादन युनिट उभारत आहेत. टेक्नॉलॉजी आणि एआय कॉरिडोर तसेच संशोधन आणि स्टार्टअप क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘इंडिया-स्वीडन सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर’ स्थापन करण्यात येईल.

आज भारत-नॉर्डिक शिखर परिषद

19 मे रोजी ओस्लो येथे होणार्‍या तिसर्‍या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत मोदी सहभागी होणार आहेत. या परिषदेत नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलंड आणि आईसलँडचे नेते सहभागी होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT