टोकियो ः (पीटीआय)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड बुलेट ट्रेनचा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला.
जपानी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, भारत आणि जपान यांच्यातील हा एक प्रमुख प्रकल्प असून काही वर्षांतच प्रवासी सेवा सुरू करण्याचे आमचे लक्ष्य आहे. भारतात 7,000 किलोमीटर लांबीचे हाय स्पीड रेल्वेचे जाळे उभारण्याच्या भारताच्या मोठ्या महत्त्वाकांक्षेचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
हाय स्पीड रेल्वेच्या पलीकडे बंदर, विमान वाहतूक, जहाजबांधणी, रस्ते वाहतूक, रेल्वे आणि लॉजिस्टिक्स यांसारख्या क्षेत्रांमध्येही भारत-जपान सहकार्य वाढवण्याची प्रचंड क्षमता आहे. या क्षेत्रांमधील जपानचे तांत्रिक कौशल्य आणि भारताची क्षमता, उत्पादन आणि नवनिर्मितीची शक्ती दोन्ही देशांसाठी मोठे मूल्य निर्माण करू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चांद्रयान-5 मोहिमेत इस्रो, ‘जाक्सा’ एकत्रित काम करणार
भारत आणि जपान ‘चांद्रयान-5’ मोहीम एकत्र मिळून राबवणार असल्याचे जाहीर करण्यात आले. इस्रो आणि जपानची अंतराळ संस्था ‘जाक्सा’ (जेएएक्सए) यांच्यात या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेसाठी सहकार्य होणार आाहे. ‘चांद्रयान-5’ मोहिमेसाठी इस्रो आणि जाक्सा यांच्यातील कराराचे आम्ही स्वागत करतो. आमचे हे सक्रिय सहकार्य पृथ्वीच्या सीमा ओलांडून अंतराळातील मानवी प्रगतीचे प्रतीक बनेल, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली.