पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्राझीलमध्ये जी २० (G20 Summit) शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी रात्री ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर (UK PM Keir Starmer) यांची भेट घेतली. उभय नेत्यांच्या भेटीदरम्यान तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, सुरक्षा आणि कल्पकता यासारख्या क्षेत्रात एकत्र काम करण्याबाबत द्विपक्षीय चर्चा झाली.
"ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासोबत रिओ द जानेरिओमध्ये झालेली बैठक अत्यंत सकारात्मक होती. भारतासाठी, ब्रिटन सोबत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. पुढील काही वर्षांत, आम्ही तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, सुरक्षा आणि कल्पकता यासारख्या क्षेत्रात एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत. आम्हाला व्यापार तसेच सांस्कृतिक संबंध मजबूत करायचे आहेत," असे पीएम मोदी यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
"पीएम मोदी यांनी भारतातून ब्रिटनमध्ये गेलेल्या फरार आर्थिक गुन्हेगारांचा मुद्दा उपस्थित केला." असे परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. द्विपक्षीय चर्चेदरम्यान, स्थलांतर आणि गतिशीलतेशी संबंधित मुद्द्यांवर करार पुढे नेण्यावर भर दिला जात आहे. उभय नेत्यांना लवकरच मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटी पुन्हा सुरू करायच्या आहेत. याचा दोन्ही देशांना कसा फायदा होईल? असा समतोल करार तयार केला जाणार आहे.
G20 शिखर परिषदेदरम्यान पहिल्या दिवशी पीएम मोदी यांनी इटली, फ्रान्स, इजिप्त, दक्षिण कोरियासह अनेक देशांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. पीएम मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्यूएल मॅक्रॉन, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल-सिसी, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सूक येओल यांची भेट घेतली. या नेत्यांच्या भेटीचे फोटो पीएम मोदी यांनी त्यांच्या X अकाउंटवर शेअर केले आहेत.