जकार्ता/नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यांना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'बिंतांग आदिपूर्ण' प्रदान करण्यात आला. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी जकार्तामधील इस्ताना मर्देका (राष्ट्रपती भवन) येथे आयोजित समारंभात मोदी यांना हा सन्मान प्रदान केला. हा सन्मान मिळवणारे मोदी हे भारताचे दुसरे पंतप्रधान ठरले. यापूर्वी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना हा सन्मान मिळाला होता.
सन्मान स्वीकारल्यानंतर मोदी म्हणाले, "हा सन्मान माझा नसून १४० कोटी भारतीयांचा आहे. तो भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील ऐतिहासिक, दृढ आणि सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक आहे. या गौरवासाठी मी राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो, इंडोनेशिया सरकार आणि जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो." 'बिंतांग आदिपूर्ण' हा 'बिंतांग रिपब्लिक इंडोनेशिया' या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानाचा सर्वोच्च दर्जाचा पुरस्कार असून, १९५९ मध्ये त्याची स्थापना करण्यात आली. इंडोनेशियाची एकता, सातत्य आणि समृद्धीसाठी अपवादात्मक योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष हे पदसिद्धरीत्या या सर्वोच्च सन्मानाचे प्रमुख (ग्रँडमास्टर) असतात आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो. सध्या पंतप्रधान मोदी इंडोनेशियाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असून, या दौऱ्यानंतर ते पुढील टप्प्यात ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत.
जागतिक स्तरावरील अनेक दिग्गज नेत्यांनाही यापूर्वी हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. त्यामध्ये फिडेल कॅस्ट्रो, आयुब खान, लिओनिड ब्रेझनेव्ह, जोसिप ब्रोझ टिटो आणि राणी एलिझाबेथ द्वितिय यांना या सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान विविध देशांकडून मिळालेल्या सन्मानांची संख्या सातत्याने वाढत आहे. यावर्षीच स्वीडन दौऱ्यात त्यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार हा सन्मान प्रदान करण्यात आला, तर गेल्या महिन्यात सेशेल्सने त्यांना 'गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन' ही उपाधी दिली होती. इंडोनेशियाकडून मिळालेला 'बिंतांग आदिपूर्ण' हा पंतप्रधान मोदी यांचा ३३ वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. जून २०२४ ते जुलै २०२५ या कालावधीत घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, ब्राझील, नामिबिया, अमेरिका, रशिया, फ्रान्स, इस्रायल, सौदी अरेबिया, भूतान, फिजी, इजिप्त, पलाऊ आणि पॅलेस्टाईनसह अनेक देशांनीही त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी गौरविले आहे.
काँग्रेसने या सन्मानावरून मोदींवर टीका केली असून, पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी 'एक्स'वरील एका पोस्टला उत्तर देत म्हटले आहे की, ‘‘नेहरूंना हा सन्मान मरणोत्तर मिळाला होता आणि त्यासाठी त्यांना कोणतीही धडपड करावी लागली नव्हती.’’ रमेश यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे.