नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
काश्मीरबाबत आमची भूमिका अतिशय स्पष्ट असून, पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर (पीओके) परत मिळवणे हेच आमचे लक्ष्य आहे. आधी ‘पीओके’ आमच्या ताब्यात द्या; मगच पाकिस्तानशी चर्चा होऊ शकते, अशी रोखठोक भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आहे. यासंदर्भात तिसर्या कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही, असे सांगत त्यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव फेटाळला. पाकिस्तानने पुन्हा आगळीक केली, तर भारताकडून त्यांना दिले जाणारे उत्तर अत्यंत विध्वंसक आणि मजबूत असेल. ‘अगर वहाँसे गोली चलेगी, तो यहाँसे गोला चलेगा,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावले.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधानांच्या निवासस्थानी रविवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मोदी यांनी सांगितले की, पाकसोबत चर्चा करण्यासारखे काहीही उरलेले नाही. पाकिस्तान जर दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात देण्याबद्दल बोलणार असेल, तरच त्या देशाशी चर्चा होऊ शकते.अन्य कोणत्याही विषयावर त्यांच्याशी चर्चा करण्याची आमची इच्छा नाही.
‘न्यूयॉर्क टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांच्याशी फोनवरून चर्चा करताना स्पष्टपणे सांगितले की, जर पाकिस्तानने यापुढे कोणतीही आगळीक केली, तर भारताकडून त्याला अधिक शक्तिशाली आणि विनाशकारी प्रत्युत्तर दिले जाईल. वास्तविक, ज्या रात्री युद्धविराम झाला, तेव्हाच पाकिस्तानने भारतातील 26 ठिकाणी हल्ले केले. त्यांनी नागरी वस्त्यांना सोडले नाही. यानंतर भारतीय सैन्याने पाकला तेवढेच जोरदार प्रत्युत्तर दिले. पाठोपाठ त्यांना धडा शिकवण्यासाठी भारताने पाकच्या ठिकाणांवर प्रतिहल्ले केले.
काश्मीरच्या मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाशी बोलून मार्ग काढण्याचे सूतोवाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी लगेच या घटनेचे स्वागत केले आणि ट्रम्प यांना धन्यवाद दिले. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदी यांनी, आम्हाला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर तिसर्या देशाने हस्तक्षेप करण्याची गरज नाही, ही भारताची सुरुवातीपासूनची भूमिका असून, मोदी यांनी त्याचाच पुनरुच्चार केला आहे.