टोकियो; वृत्तसंस्था : आज जग केवळ भारताकडे पाहत नाही, तर ते भारतावर अवलंबून आहे. या दौर्यातून दोन्ही देशांमधील ‘विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारी’ अधिक द़ृढ होण्याचे संकेत मिळत आहेत, असे ठाम प्रतिपादन पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. इंडो - जपान इकॉनॉमिक फोरमला संबोधित करताना ते बोलत होते.
पंतप्रधानांनी भाषणात भारत आणि जपान यांच्यातील मजबूत भागीदारीवर जोर दिला. उत्पादन, तंत्रज्ञान, नवनिर्मिती, हरित ऊर्जा आणि कौशल्य विकास यांसारख्या क्षेत्रांमध्ये भविष्यातील सहकार्याच्या संधी त्यांनी अधोरेखित केल्या. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या विकास यात्रेत जपान नेहमीच एक महत्त्वाचा भागीदार राहिला आहे. जपानचे कौशल्य आणि भारताची विशालता एक परिपूर्ण भागीदारी तयार करू शकते. जपानचे पंतप्रधान इशिबा यांच्या मताशी सहमती दर्शवत मोदी म्हणाले, जपान एक तंत्रज्ञान शक्तिस्थान आहे, तर भारत प्रतिभेचे शक्तिस्थान आहे. एकत्रितपणे आपण या शतकातील तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करू शकतो. भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि अंतराळ यांसारख्या क्षेत्रांमध्ये धाडसी पावले उचलली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आज भारतात राजकीय स्थिरता, आर्थिक स्थिरता, धोरणांमध्ये पारदर्शकता आणि धोरणात्मक निश्चितता आहे, असे सांगत मोदींनी भारताच्या आर्थिक सामर्थ्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असून लवकरच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. देशातील मजबूत बँकिंग क्षेत्र, कमी महागाई आणि सुमारे 700 अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा हे भारताच्या आर्थिक ताकदीचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. आमचा ‘सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन’ हा द़ृष्टिकोन या प्रगतीला चालना देत आहे, असेही ते म्हणाले.
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनीही द्विपक्षीय आर्थिक संबंधांचे कौतुक केले. ते म्हणाले, जपानचे प्रगत तंत्रज्ञान आणि भारताची अद्वितीय प्रतिभा एकमेकांना पूरक आहेत, ज्यामुळे आमच्या आर्थिक सहकार्यात नाट्यमय वाढ झाली आहे. अनेक जपानी कंपन्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जपानने आतापर्यंत भारतात 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली असून मेट्रो रेल्वेपासून ते सेमीकंडक्टरपर्यंत अनेक क्षेत्रांत जपानचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे.