पुढारी ऑनलाईन डेस्क : अझरबैजानहून रशियाला जाणारे विमान प्रवासी विमान कझाकिस्तानमध्ये कोसळून (Kazakhstan Plane Crash) अपघात झाला. या विमानातून सुमारे 62 प्रवासी आणि पाच क्रु मेंबर असे 67 लोक प्रवास करत होते. कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाने, या दुर्घटनेत 42 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली आहे. तर कझाक परिवहन मंत्रालयाने सांगितले आहे की या अपघातातून 25 जण बचावले आहेत. हे विमान अझरबैजानमधील बाकू येथून रशियातील चेचन्याची राजधानी ग्रोझनी येथे जात होते. पक्ष्यांचा थवा विमानावर आदळल्याने विमानामध्ये बिघाड झाला. त्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करताना विमान कझाकिस्तानमध्ये कोसळले, 'राउटर्स'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
हे अपघातग्रस्त विमान अझरबैजान एअरलाइन्सचे आहे. कझाकिस्तानच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, या दुर्घटनेत 25 जण बचावले आहेत. विमान कंपनीचा हवाला देत अझरबैजानने सांगितले की, विमानाला पक्षी धडकल्याने हा अपघात झाला. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये विमान जमिनीवर कोसळताना दिसत आहे. अझरबैजान एअरलाइन्सकडून या अपघातावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
अलीकडेच ब्राझीलमध्ये विमान अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला होता. मृत्युमुखी पडलेले 10 लोक विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. ब्राझीलच्या सिव्हिल प्रोटेक्शन एजन्सीने सांगितले की, या घटनेत जमिनीवरील डझनहून अधिक लोक जखमी झाले आहेत. विमान एका घराच्या चिमणीला आदळले आणि नंतर एका मोठ्या निवासी भागातील मोबाईल फोनच्या दुकानाला धडकण्यापूर्वी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आदळले, असे एजन्सीने ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. मैदानावर उपस्थित डझनहून अधिक लोक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. अपघाताचे कारण काय हे स्पष्ट होऊ शकले नाही.