Colombia Plane Crash | कोलंबियात विमान कोसळले; 15 मृत्युमुखी File photo
आंतरराष्ट्रीय

Colombia Plane Crash | कोलंबियात विमान कोसळले; 15 मृत्युमुखी

दुर्गम, डोंगराळ भागात भीषण दुर्घटना; बचाव कार्यात अडथळे

पुढारी वृत्तसेवा

बोगोटा (कोलंबिया); वृत्तसंस्था : ईशान्य कोलंबियामध्ये एका प्रवासी विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातात विमानातील सर्व 15 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये कोलंबियाचे खासदार डायोजेनेस क्विंटरो अमाया आणि उमेदवार कार्लोस साल्सेडो यांचा समावेश आहे. कोलंबियाची सरकारी विमान कंपनी सातेनाद्वारे संचलित हे बीचक्राफ्ट 1900 विमान कुकुटा येथून व्हेनेझुएला सीमेजवळील ओकानाकडे जात होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली.

सातेना एअरलाईन्सचे बीचक्राफ्ट (नोंदणी क्रमांक -4709) या विमानात 13 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स असे एकूण 15 जण होते. कोणाचाही जीव वाचू शकला नाही. विमान ज्या भागात कोसळले तो भाग डोंगराळ आणि दुर्गम आहे. त्या ठिकाणी अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडले. दाट जंगलामुळे शोध आणि बचाव कार्यात अडचणी येत असल्याची माहिती आपत्कालीन आणि बचाव पथकाच्या वतीने देण्यात आली.

या विमान दुर्घटनेतील मृतांमध्ये मानवाधिकार कार्यकर्ते आणि कोलंबियाच्या संसदेतील बडे नेते 36 वर्षीय डायोजेनेस क्विंटरो अमाया यांचा समावेश आहे. ते संघर्षग्रस्त काटाटुम्बो प्रदेशातील पीडितांचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्यासोबत त्यांचे सहायक आणि आगामी निवडणुकीतील उमेदवार कार्लोस साल्सेडो यांचाही मृत्यू झाला.

कोलंबियाच्या वाहतूकमंत्री मारिया फर्नांडा रोजास यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबीयांच्या प्रती संवेदना प्रकट केल्या आहेत. ‘संपूर्ण देश शोकात आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे,’ असे त्यांनी सांगितले. हा प्रदेश डोंगराळ भूप्रदेश आणि आव्हानात्मक हवामानासाठी ओळखला जातो, ज्यामुळे विमान वाहतुकीसाठी हा भाग अत्यंत संवेदनशील मानला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT