Philippines earthquake
बोगो: मध्य फिलिपिन्स आज (दि. १) सकाळी शक्तीशाली भूकंपाने हादरला. भूकंपात मृतांची संख्या ६९ वर पोहोचली आहे, तर १५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली. बचाव पथके कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यातून आणखी लोकांना बाहेर काढत असल्याने ही संख्या वाढू शकते, असही त्यांनी सांगितले.
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू बोगाच्या सुमारे १७ किलोमीटर ईशान्येस होता. बोगा हे सेबू प्रांतातील पर्यटन स्थळामध्ये असलेले सुमारे ९०,००० लोकसंख्या असलेले एक किनारपट्टीचे शहर आहे. या भूकंपामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात इमारती व रस्ते उद्ध्वस्त झाले. सर्वाधिक फटका बसलेल्या भागांपैकी एक असलेल्या बोगा येथे सुमारे १४ मृत्यूंची नोंद झाली आहे. एका डोंगराळ गावात झालेल्या भूस्खलनामुळे संपूर्ण गाव गाडले गेले आहे. बचाव कार्यासाठी खोदकाम करणारी यंत्रसामग्री व इतर जड उपकरणे तातडीने आणली जात आहेत.
बोगा येथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, अनेक घरे, भिंती आणि रस्त्यांना मोठे तडे गेले. अग्निशमन दलाच्या एका जवानाने सांगितले की, धक्क्यांमुळे त्यांच्या स्टेशनची एक भिंत कोसळली, ज्यात काही रहिवासी आणि जवान जखमी झाले. भीतीने शेकडो रहिवासी आपापल्या घरांमध्ये परतण्यास घाबरत होते आणि त्यांनी रात्रभर मोकळ्या मैदानात आश्रय घेतला. या भूकंपात अनेक व्यावसायिक आस्थापने आणि रस्त्यांचे नुकसान झाले. तसेच, तीव्र धक्क्यांमुळे जवळच्या दंताबंटायन येथील ऐतिहासिक रोमन कॅथोलिक चर्चही कोसळले.