न्यूयॉर्क: पुढारी ऑनलाईन
इंद्रा नूयी यांनी 'पेप्सीको'च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या १२ वर्षापासून त्या या पदावर काम करत आहेत. कंपनीच्या संचालक मंडळाने इंद्रा नूयी यांच्या जागी रेमन लागुर्टा यांची नियुक्ती केली आहे. ते ३ ऑक्टोबरपासून सीईओ पदाची जबाबदारी स्विकारतील. त्याच दिवशी इंद्रा नूयी या पदावरून पायउतार होतील. इंद्रा नूयी गेल्या २४ वर्षांपासून पेप्सीकोमध्ये काम करत आहेत. अर्थात २०१९पर्यंत त्या चेअरमनपदावर कायम राहतील.
भारतीय वंशाच्या अमेरिकन इंद्रा नूयी या 'पेप्सीको'च्या सीईओपदावर पोहोचलेल्या पहिल्या महिला आहेत. फोर्ब्स मासिकाच्या जगातील १०० शक्तिशाली महिलांच्या यादीत २००८ मध्ये त्या १३ व्या क्रमांकावर होत्या. याशिवाय फॉर्चुन मॉगझिनने त्यांना २००६ सालच्या सर्वात शक्तिशाली महिला व्यावसायिक जाहीर केला होता.
नूयी यांच्या जागेवर येणारे नवे सीईओ लागुर्टा पेप्सीमध्ये गेल्या २२ वर्षापासून काम करत आहेत. गेल्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांना अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नूयी यांच्या शिवाय नेतृत्वात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
भारतात माझे बालपण गेले आहे. तेव्हा कधीच मी असा विचार केला नव्हता की इतक्या मोठ्या कंपनीचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळेल. स्वप्नात मी जितका विचार केला होता. त्यापेक्षा अधिक चांगला बदल लोकांच्यात करता आला. पेप्सिको आज मजबूत स्थितीत आहे आणि त्याचा सुवर्णकाळ आणखी येणार आहे, असे इंद्रा नूयी यांनी म्हटले आहे.