भारतात शिक्षा, परदेशी सन्मान : अरुंधती रॉय यांना पेन पिंटर पुरस्कार जाहीर File Photo
आंतरराष्ट्रीय

भारतात शिक्षा, परदेशी सन्मान : अरुंधती रॉय यांना पेन पिंटर पुरस्कार जाहीर

नोबेल विजेते नाट्यलेखक हेरॉल्ड पिंटर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांना प्रतिष्ठेचा पेन पिंटर प्राईज २०२४ जाहीर झाला आहे. नोबेल विजेते नाट्यलेखक हेरॉल्ड पिंटर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २००९पासून हा पुरस्कार दिला जातो. इंग्लिश पेन आणि ब्रिटिश लायब्ररी संयुक्तरीत्या हा पुरस्कार देतात. १० ऑक्टोबरला पुरस्कार वितरण होईल, तसेच त्या वेळी अरुंधती रॉय मार्गदर्शनही करणार आहेत.

हा पुरस्कार युनायटेड किंगडम, आयर्लंड किंवा कॉमनवेल्थमधील लेखकांना दिला जातो. लेखकांचे साहित्यक्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन या पुरस्काराने गौरवण्यात येते.

रुथ बॉर्थिक, खालिद अब्दलाल आणि रॉजर रॉबिन्सन या तिघांच्या समितीने अरुंधती रॉय यांच्या नावाची शिफारस या पुरस्कारासाठी केली. "अरुंधती रॉय यांचा प्रभावी आवाज कधीच शांत करता आला नाही. आपले जीवन, आपला समाज यांचे सत्य यांची व्याख्या करणाऱ्या त्या आक्रमक विचारवंत आहेत," असे या निवडकर्त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी हा पुरस्कार मार्गारेट अॅटवूड, मॅलोरि ब्लॅकमन, सलमान रश्दी, टॉम स्टोपार्ड, कॅरोल अॅन डफी आदींना देण्यात आला आहे.

अरुंधती रॉय यांची सर्वांत गाजलेली कादंबरी म्हणजे 'गॉड ऑफ द स्मॉल थिंग्ज.' त्यांना या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार मिळाला होता. याशिवाय द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपिनेस, कॅपिटॅलिझ अ घोस्ट स्टोरी, वॉकिंग विथ कॉम्रेड्स अशा काही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

'भारतात वादग्रस्त लेखिका'

अरुंधती रॉय त्यांच्या काश्मीर संदर्भातील भूमिकेमुळे बऱ्याच वेळा वादात असतात. २०१०ला त्यांनी काश्मीर संदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात Unlawful Activities (Prevention) Act (UAPA)नुसार कारवाई करण्याची परवानगी नवी दिल्लीचे नायब राज्यपाल व्हि. के. सक्सेना यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT