इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी तुर्कस्तानच्या इस्तंबूल शहरात आयोजित करण्यात आलेली शांतता चर्चा कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय निष्फळ ठरली आहे. मात्र, या बंद दाराआड झालेल्या चर्चेतून दोन असे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत, ज्यांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. पहिला खुलासा म्हणजे अमेरिका अफगाणिस्तानात हवाई हल्ले करण्यासाठी पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर करत आहे आणि हे हल्ले रोखण्यात पाकिस्तान हतबल ठरत आहे; तर दुसरा आणि अधिक गंभीर खुलासा म्हणजे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नागरी सरकारला पूर्णपणे बाजूला सारून जनरल असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी लष्कर अफगाणिस्तानसोबतचा तणाव जाणीवपूर्वक वाढवत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले आहेत. याच महिन्यात पाकिस्तानने तालिबान शासित अफगाणिस्तानच्या अंतर्गत भागात हवाई हल्ले आणि गोळीबार केला होता. या हल्ल्यांमध्ये महिला आणि मुलांसह डझनभर अफगाण नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. याआधी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात दोन्ही देशांच्या सीमेवर झालेल्या चकमकींमध्ये 250 हून अधिक लोकांचा बळी गेला होता. या पार्श्वभूमीवर तुर्कस्तान आणि कतारच्या दबावानंतर दोन्ही देश इस्तंबूलमध्ये चर्चेसाठी एकत्र आले होते. मात्र ही चर्चा केवळ एक फार्स ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
इस्तंबूलमधील बैठकीत पाकिस्तानच्या लष्कराने पुन्हा एकदा आपला हेतू साध्य केल्याचा आरोप तालिबानने केला आहे. तालिबानच्या मते, पाकिस्तानी लष्कराने काबूलसोबत तणाव कायम ठेवून आपले हित साधण्यासाठी शाहबाज शरीफ यांच्या नागरी सरकारला पूर्णपणे डावलले आहे. आता पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणाशी संबंधित सर्व महत्त्वाचे निर्णय थेट लष्कर घेत असून त्यात नागरी सरकारची भूमिका केवळ नाममात्र उरली आहे.
तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या कार्यकाळातील संबंधांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, इम्रान खान यांच्या काळात अफगाणिस्तान - पाकिस्तान संबंध मजबूत होते आणि अनेक उपक्रम सुरळीतपणे सुरू होते.