नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पाकिस्तान, चीन गुप्तपणे अण्वस्त्र चाचणी करत असल्याचा गौप्यस्फोट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर पाकिस्तानने याच वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात गुप्तपणे अणुचाचण्या केल्या असण्याची अटकळ बांधण्यात येत आहे. कारण, या काळात अफगाणिस्तान-पाकिस्तान प्रदेशात 4.0 ते 4.7 तीव्रतेचे भूकंप झाले होते, त्या नोंदी पाकिस्तानच्या 1998 मधील चागाई-1 आणि चागाई-2 अणुचाचण्यांच्या नोंदींशी मिळत्याजुळत्या आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान अणुचाचण्या गुप्तपणे करत असल्याच्या केलेल्या विधानानंतर भारताने त्वरित आणि सडेतोड उत्तर दिले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, पाकिस्तानच्या गुप्त आणि बेकायदेशीर आण्विक कारवाया त्याच्या इतिहासाशी सुसंगत आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ट्रम्प यांच्या विधानावर भाष्य केले. जैस्वाल म्हणाले, पाकिस्तानच्या आण्विक कारवायांचा इतिहास तस्करी, निर्यात नियंत्रण नियमांचे उल्लंघन, गुप्त भागीदारी आणि ए. क्यू. खान नेटवर्क तसेच पुढील प्रसाराभोवती फिरतो. भारताने नेहमीच आंतरराष्ट्रीय समुदायाचे पाकिस्तानच्या या नोंदीकडे लक्ष वेधले आहे. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानच्या अणुचाचणीबद्दल अध्यक्ष ट्रम्प यांच्या टिपणीची आम्ही नोंद घेतली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सीबीएसच्या 60 मिनिटस् या कार्यक्रमातील मुलाखतीत दावा केला की, रशिया, चीन आणि पाकिस्तान अणुचाचण्या करत आहेत. त्यांनी म्हटले होते, रशिया चाचणी करत आहे आणि चीनही करत आहे; पण ते बोलत नाहीत... आम्ही चाचणी करणार आहोत; कारण ते चाचणी करत आहेत आणि इतरही करत आहेत आणि निश्चितच उत्तर कोरिया चाचणी करत आहे. पाकिस्तानही चाचणी करत आहे. ट्रम्प यांनी या दाव्यासाठी कोणताही ठोस पुरावा दिला नाही.
पाकिस्तानने मात्र आपल्यावर झालेले आरोप सातत्याने फेटाळून लावले आहेत. ट्रम्प यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना एका वरिष्ठ पाकिस्तानी सुरक्षा अधिकार्याने सीबीएस न्यूजला सांगितले की, देश अणुचाचण्या पुन्हा सुरू करणारा पहिला देश ठरणार नाही. 1998 मध्ये भारताने राजस्थानमधील पोखरण-अणुचाचण्यांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने अधिकृत चाचण्या केल्या होत्या. त्यानंतर, पाकिस्तानने सर्वसमावेशक अणुचाचणी बंदी करारावर स्वाक्षरी केली नसली, तरी एकतर्फी स्थगिती पाळत असल्याचे म्हटले आहे.
भारताने नेहमीच पाकिस्तानच्या आण्विक प्रसाराच्या धोक्यांबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायाला सावध केले आहे. ट्रम्प यांच्या विधानावर भारताची प्रतिक्रिया ही पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमातील पारदर्शकतेच्या अभावावर केलेले थेट भाष्य मानले जात आहे.