Pakistan's Defence Minister on Islamabad suicide attack
"पाकिस्तान हा पूर्व सीमेवर भारताविरुद्ध आणि पश्चिम सीमेवर तालिबानविरुद्ध दोन आघाड्यांवर युद्धासाठी पूर्णपणे सज्ज आहे," असे आणखी एक प्रक्षोभक विधान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना इस्लामाबाद आत्मघाती बॉम्बस्फोटाचे अफगाणिस्तानशी जोडले संबंध जोडत टाळ्या मिळविण्यासाठी भारताविरोधात त्यांनी गरळ ओकली.
इस्लामाबादमध्ये मंगळवारी झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात १२ जण ठार आणि ३६ जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी या हल्ल्यात भारताच्या पाठिंबा असलेल्या गटाने केल्याचा आरोप केला. तर या आत्मघाती बॉम्बस्फोटाची जबाबदारी पाकिस्तानी तालिबान (टीटीपी) ने स्वीकारली आहे. "अफगाणिस्तानचे राज्यकर्ते पाकिस्तानमधील दहशतवाद थांबवू शकतात; परंतु हे युद्ध इस्लामाबादपर्यंत पोहोचवणे हा काबूलने आम्हाला दिलेला संदेश आहे. पाकिस्तानकडे प्रत्युत्तर देण्याची पूर्ण ताकद आहे," असे आसिफ यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
दिल्ली कार स्फोटानंतरही आसिफ यांनी प्रक्षोभक विधान केले होते. त्यांनी म्हटलं होतं की, "कालपर्यंत हा गॅस सिलेंडर स्फोट होता. आता ते याला परदेशी कट रचण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत लवकरच त्यासाठी पाकिस्तानला दोष देऊ शकतो. तसेच भारत या घटनेचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा पोरकट आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, भारताने आसिफ यांना सडेतोड प्रत्युत्तर देत हा लक्ष विचलित करण्याचा एक केवीलवाणी प्रयोग असल्याचे म्हटले होते.