Pakistan Newspaper AI: पाकिस्तानमधील सर्वाधिक खपाच्या 'डॉन' या दैनिकाने कार विक्रीवरील एका रिपोर्टमध्ये चक्क AI प्रॉम्प्ट (Artificial Intelligence Prompt) प्रकाशित केला. एआयचा वापर करून लिहिलेल्या बातमीमधील प्रॉम्प्ट छपाईवेळी तसाच राहिला. प्रकाशित झालेल्या बातमीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तुफान चर्चा रंगली आणि हा वादाचा विषय ठरला आहे.अखेर दिलगिरी व्यक्त करत या चुकीवर पडदा टाकण्यात आला आहे.
पाकिस्तानमधील 'डॉन' या इंग्रजी दैनिकाने १२ नोव्हेंबर २०२५ रोजी एक बातमी प्रकाशित केली. ही बातमी देशातील ऑटा क्षेत्रातील तेजीवर होते. त्याचे शीर्षक होते ऑटो विक्रीला 'गियर'. मात्र या बातमीच्या शेवटी "तुम्हाला हवे असल्यास, मी 'फ्रंट-पेज स्टाईल' मध्ये अधिक आकर्षक सादरीकरण... तयार करू शकेन. तुम्हाला ते करायला आवडेल का?"...असा AI प्रॉम्प्ट छापला गेला. दैनिकाने तत्काळ डिजिटल आवृत्तीमध्ये ही चूक दुरुस्त केली. मात्र प्रकाशित झालेल्या आवृत्तीची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आणि हा वादाचा विषय ठरला आहे.
ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर वृत्तपत्राने संपादकांनी एक अधिकृत निवेदन जारी केले. या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, "आजच्या 'डॉन' मध्ये प्रकाशित झालेली ही बातमी मूळतः AI वापरून संपादित करण्यात आली होती. हे आमच्या सध्याच्या AI धोरणाचे उल्लंघन आहे. हे धोरण आमच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. मूळ बातमीत संपादकीय प्रक्रियेतील AI-जनरेटेड अतिरिक्त मजकूरही आला होता. हा मजकूर डिजिटल आवृत्तीतून संपादित करून काढण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, AI धोरणाचे उल्लंघन झाल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत."