इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन
भारताशी द्वेष करून सातत्याने चीनची तळी उचलणाऱ्या पाकिस्तानची कोरोना व्हायरसमुळे चांगलीच गोची झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात चीनची नाचक्की झाली आहे. चीनमधील यूईगूर मुस्लिमांवरूनही पाकिस्तानची बसलेली दातखिळी सुद्धा भूवया उंचावणारी आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने भारताने आपल्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी कंबर कसली आहे. दुसरीकडे पाकिस्तानी विद्यार्थी मात्र त्यांच्या सरकारचे वाभाडे काढत आहेत.
एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चीनमध्ये अडकलेले पाकिस्तानी विद्यार्थी भारत सरकारचे कौतुक करत आहेत आणि इम्रान खान सरकारला शिव्या देत आहेत. हे पाकिस्तानी विद्यार्थी चीनच्या वुहान शहरात अडकले आहेत. त्यांनी आता लष्कर प्रमुखांना मदतीचे आवाहन केले आहे.
चीनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थी कोरोना विषाणूचा बालेकिल्ला झालेल्या चीनमधील वुहानमध्ये जीवन-मृत्यूचा सामना करत आहेत. त्यांनी इम्रान सरकारकडे मदतीची याचना केली आहे. दुसरीकडे पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष ट्विट करून स्वत:चे वस्त्रहरण करत आहेत. ते ट्विटमध्ये म्हणतात, 'एखाद्या महामारीचा प्रादुर्भाव होण्यासंबंधी प्रेषित मोहम्मद यांनी दिलेले मार्गदर्शक मार्ग आजही उत्तम आहेत, जर एखाद्या ठिकाणी प्लेग पसरण्याविषयी ऐकले तर तिथे जाऊ नका, पण प्लेग ज्या ठिकाणी आपण आधीपासून अस्तित्वात आहात अशा ठिकाणी पसरला असेल, तर आपण त्या ठिकाणाहून कुठेही जाऊ नका (बुखारी आणि मुस्लिम) त्या ठिकाणी अडकलेल्या लोकांना आपली मदत होऊ द्या.'
या विद्यार्थ्यांनी इम्रान खान सरकारवर जोरदार टीका केली आणि सांगितले की भारत, बांगलादेश, अमेरिका, जॉर्डन, जपान, तुर्की, कोरिया येथील नागरिकांना तेथून हलवले आहे, परंतु पाकिस्तान सरकार आतापर्यंत झोपले आहे. जगभरातील मीडिया हा व्हिडिओ दर्शवित आहे, ज्यामध्ये हे विद्यार्थी इम्रान खान यांना आवाहन करीत आहेत की आमचा संपर्क दूतावासातून खंडित झाला आहे. चार पाकिस्तानी नागरिकांनाही याचा फटका बसल्याचे बोलले जात आहे, परंतु पाकिस्तान सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
दरम्यान, पाकिस्तानचे आरोग्यमंत्री जफर मिर्झा म्हणाले की, सोमवारी 57 पाकिस्तानी इस्लामाबादमध्ये दाखल झाले. ते पाकिस्तानी विद्यार्थ्यांविषयी म्हणाले की वुहान आणि चीनच्या इतर भागात किमान 100 देशांचे नागरिक राहत आहेत. आम्ही नागरिकांना विमान देण्यासाठी काही देशांचे अनुकरण करणार नाही. ते म्हणाले की करोना विषाणूचा प्रसार एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे होत आहे. याचा अर्थ असा की एका रूग्णातून दुसऱ्या रुग्णात जाण्याचा विषाणूचा स्रोत असू शकतो. ते म्हणाले की, एक जबाबदार देश म्हणून पाकिस्तान बहुसंख्य देशांच्या सुरक्षेची दखल घेऊन पावले उचलत आहे. दुसरीकडे, पाक राष्ट्रपती म्हणाले आहेत की आम्ही करोना विषाणूचा सामना करण्याच्या चीनी सरकारच्या प्रयत्नाचे समर्थन करतो.