दुबई : पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी शुक्रवारी दुबईत स्पष्ट केले की, नव्याने झालेल्या संरक्षण कराराअंतर्गत सौदी अरेबियाला आवश्यकता भासल्यास पाकिस्तानचे अण्वस्त्र संरक्षण आणि कार्यक्रम उपलब्ध करून दिले जाईल.
पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये बुधवारी एक महत्त्वपूर्ण संरक्षण करार झाला. या करारानुसार एका देशावर हल्ला म्हणजे दुसर्या देशावर हल्ला मानला जाणार आहे. यामुळे दोन्ही देशांमधील लष्करी भागीदारी औपचारिक स्वरूपात अधिक दृढ झाली आहे. या हालचालीकडे इस्रायलसाठी दिलेला अप्रत्यक्ष संदेश म्हणून पाहिले जात आहे. मध्य पूर्वेतील इस्रायल हा एकमेव अण्वस्त्रधारी देश असल्याचे सर्वसाधारण मानले जाते. पाकिस्तान-सौदी करारानंतर या समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही घोषणा अशा वेळी झाली आहे, जेव्हा इस्रायलने मागील आठवड्यात कतारमध्ये हमास नेत्यांना लक्ष्य करत केलेल्या हल्ल्यात सहाजण ठार झाले. या घटनेनंतर आखाती अरब राष्ट्रांमध्ये सुरक्षेबाबत चिंता अधिक गडद झाली आहे. परिणामी सौदी-पाक कराराला या प्रदेशातील सामरिक संतुलनाचा महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे.
दुबईत पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांचे वक्तव्य
पाकिस्तानने सौदी अरेबियाला अण्वस्त्र संरक्षण उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली
दोन्ही देशांचा संरक्षण करार : एका देशावर हल्ला म्हणजे दुसर्यावर हल्ला.
इस्रायलसाठी अप्रत्यक्ष संदेश मानला जातो.
कतारमधील हमास नेत्यांवरील इस्रायली हल्ल्यानंतर आखाती राष्ट्रांची चिंता वाढली.