नवी दिल्ली : दहशतवादाच्या मुद्द्यावर जागतिक स्तरावर एकाकी पडलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर हात जोडून लोटांगण घातलं आहे. भारतासोबत चर्चा करण्यासाठी मदत करण्याची विनंती त्यांनी ट्रम्प यांना केली आहे.
इस्लामाबादमधील अमेरिकन दूतावासात एका कार्यक्रमाला संबोधित करताना शेहबाज यांनी भारतासोबतचा तणाव कमी करण्यात ट्रम्प यांच्या भूमिकेचे कौतुक केले. तसेच भारत-पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये सर्वसमावेशक चर्चा घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांनी ट्रम्प यांना केली. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या वक्तव्याची शरीफ यांनी पुनरावृत्ती केली. ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील शत्रुत्व संपवण्यात महत्वाची भूमिका बजावली, त्यांना त्याचे श्रेय दिले पाहिजे, असे भूट्टो यांनी म्हटले होते. ट्रम्प यांनी १० वेळा भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी साधण्यात स्वत:चे श्रेय सांगितले आणि ते योग्यच आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे युद्धबंदी शक्य झाली. त्यामुळे जर अमेरिका ही युद्धबंदी राखण्यात पाकिस्तानला मदत करण्यास तयार असेल, तर व्यापक संवाद आयोजित करण्यात अमेरिकेची भूमिका आपल्यासाठी फायदेशीर ठरेल, असे भुट्टो म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर नंतर ट्रम्प यांनी युद्धबंदी करारात कोणतीही भूमिका बजावली नाही, असे भारताने आधीच स्पष्ट केले आहे. भारताने द्विपक्षीय मुद्द्यांवर तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीला सातत्याने नकार दिला आहे.
अमेरिकेत भारतीय सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे नाव अतिशय उत्तम प्रकारे निवडले गेले आहे. बुधवारी अमेरिकेतील नॅशनल प्रेस क्लबमध्ये थरूर म्हणाले की, सिंदूरचा रंग रक्ताच्या रंगापेक्षा फारसा वेगळा नाही. त्यांनी 'खून का बदला खून' हा हिंदी वाक्प्रचार देखील वापरला. याचा अर्थ दहशतवाद्यांनी सिंदूरशी ज्या पद्धतीने वर्तनुक केली त्याचा बदला खून आहे.