इस्लामाबाद : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या कारवाईत उद्ध्वस्त झालेल्या लष्कर-ए-तोयबाच्या मुख्यालयाला पाकिस्तान पुन्हा उभे करण्याच्या तयारीत आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार, पाकिस्तानी सरकार आणि लष्कराने या दहशतवादी संघटनेला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे मुरिदके येथील मरकज-ए-तोयबाची पुनर्बांधणी वेगाने सुरू आहे. ही घडामोड भारतासाठी एक नवीन आव्हान म्हणून समोर येत आहे. कारण यामुळे पाकिस्तानच्या दहशतवादाला खतपाणी घालणार्या धोरणाला आणखी बळकटी मिळत आहे.
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरिदके येथील लष्कर-ए-तोयबाच्या मुख्यालयावर अचूक हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात मरकज-ए-तोयबाचा सुमारे 70 टक्के भाग उद्ध्वस्त झाला होता.
ताज्या गुप्तचर माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने लष्कर-ए-तोयबाला 4 कोटी पाकिस्तानी रुपयांचा (सुमारे 1.25 कोटी भारतीय रुपये) सुरुवातीचा निधी दिला आहे. एकूण पुनर्बांधणीवर 15 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे.
हा निधी पूर मदत निधीतून घेण्यात आला आहे, जो यापूर्वी 2005 च्या भूकंपाच्या वेळीही दहशतवादी संघटनांना गुप्तपणे मदत पोहोचवण्यासाठी वापरला गेला होता. तोयबाचे कमांडर मौलाना अबू जर आणि युनूस शाह बुखारी या प्रकल्पावर देखरेख ठेवत आहेत.
5 फेब्रुवारी 2026 रोजी ‘काश्मीर एकता दिना’पूर्वी पुनर्बांधणी पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. या दिवशी पाकिस्तान भारतविरोधी प्रचार करतो. नवीन मुख्यालयाचा वापर प्रशिक्षण, ब्रेनवॉशिंग आणि दहशतवादी कारवायांचे केंद्र म्हणून करण्याची योजना आहे.