Global Terrorism Index 2026 | जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान ‘जगात टॉप’वर  
आंतरराष्ट्रीय

Global Terrorism Index 2026 | जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान ‘जगात टॉप’वर

इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसच्या ताज्या अहवालात दक्षिण आशिया आणि साहेल प्रदेशाला दहशतवादाचा सर्वाधिक फटका

पुढारी वृत्तसेवा

लंडन; वृत्तसंस्‍था : जगभरातील दहशतवादाच्या स्थितीचा आढावा घेणाऱ्या ‘इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस’ या संस्थेच्या 'जागतिक दहशतवाद निर्देशांक २०२६' (Global Terrorism Index 2026) या ताज्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, भारताचा शेजारील देश पाकिस्तान दहशतवादाचा सर्वाधिक फटका बसलेला देश ठरला आहे. तो जगात पहिल्या स्थानावर आहे. या निर्देशांकात पाकिस्तानने ८.५७४ गुण मिळवले, ज्यामुळे तो बुर्किना फासोला मागे टाकून जगातील सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश बनला.

या निर्देशांकामध्ये दहशतवादी घटना, जीवितहानी, जखमींची संख्या, बंधक बनवण्याच्या घटना आणि मालमत्तेचे होणारे नुकसान यांसारख्या विविध निकषांचा विचार करून देशांना गुण दिले जातात. जास्तीत जास्त १० गुणांच्या या मानांकनात पाकिस्तानला ८.६ गुण मिळाले असून पाकिस्तानमधील राजकीय अस्थिरता आणि तेथे सक्रिय असलेल्या विविध दहशतवादी संघटनांमुळे ही स्थिती ओढवल्याचे तज्ज्ञांचे मत आहे; तर भारतदेखील या यादीत पहिल्या १५ देशांमध्ये समाविष्ट आहे.

साहेल प्रदेशातही वाढती चिंता

पाकिस्ताननंतर आफ्रिकेतील साहेल प्रदेशातील देशांमध्ये दहशतवादाचा मोठा प्रभाव दिसून येत आहे. या यादीत बुर्किना फासो (८.३ गुण) दुसऱ्या स्थानावर आहे, तर नायजर आणि नायजेरिया दोन्ही ७.८ गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. याव्यतिरिक्त माली (७.६ गुण) देखील या प्रमुख प्रभावित देशांमध्ये समाविष्ट आहे. पश्चिम आफ्रिकेतील या देशांमध्ये इस्लामी अतिरेकी गट आणि स्थानिक बंडखोरांच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाल्याचे हा अहवाल दर्शवितो.

भारताचे स्थान आणि दक्षिण आशियातील स्थिती

दक्षिण आशिया प्रदेशात पाकिस्तान व्यतिरिक्त अफगाणिस्तान आणि भारताची स्थितीही गंभीर आहे. अफगाणिस्तान ६.७ गुणांसह या यादीत ११ व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे भारत ६.४ गुणांसह जगात १३ व्या स्थानावर आहे. भारतात दहशतवादी हल्ल्यांची तीव्रता जरी पाकिस्तानच्या तुलनेत कमी असली, तरी जम्मू आणि काश्मीरसह काही इतर भागांत सुरू असलेल्या हिंसक कारवाया आणि नक्षलवादामुळे भारताचा या यादीत समावेश झाला आहे.

ग्‍लोबल निर्देशांकात पाकिस्तान अव्वल स्थानी कसा पोहोचला

१. सलग सहाव्या वर्षी मृत्यूंमध्ये वाढ : जागतिक कलाच्या विरुद्ध, पाकिस्तानमध्ये मृतांची संख्या सातत्याने वाढत राहिली आहे. २०२५ मध्ये मृत्यूंमध्ये सुमारे ६ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. मृत्यूंच्या संख्येत वाढ होण्याचे हे सलग सहावे वर्ष ठरले.

२. ओलिस (बंधक) ठेवण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ : एकीकडे दहशतवादी हल्ल्यांची एकूण संख्या २०२४ मधील १,०९८ वरून २०२५ मध्ये किंचित घटून १,०४५ झाली असली, तरी ओलिस ठेवण्याच्या प्रकरणांमध्ये अनपेक्षित वाढ झाली. २०२४ मध्ये ओलिस ठेवण्याच्या १०१ घटना घडल्या होत्या, ज्या २०२५ मध्ये थेट वाढून ६५५ वर पोहोचल्या.

३. इतिहासात पहिल्यांदाच अग्रस्थानी : पाकिस्तान या निर्देशांकात कायमच सर्वाधिक प्रभावित १० देशांच्या यादीत राहिला आहे, परंतु वाढती हिंसा आणि जीवितहानीच्या उच्च प्रमाणामुळे इतिहासात पहिल्यांदाच तो पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

‘घरात पाळलेले साप आता देशालाच डसतायत’; अमेरिकेतील माजी पाकिस्तानी राजदूत हुसेन

हक्कानींचा पाकिस्तान सरकारवर घणाघात

‘ग्लोबल टेररिझम इंडेक्स २०२६’मध्ये पाकिस्तान दहशतवादाचा सर्वाधिक फटका बसलेला देश ठरल्यानंतर अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत हुसेन हक्कानी यांनी शाहबाज सरकारवर जोरदार टीका केली आहे. पाकिस्तानने ५० वर्षांपूर्वी जिहादींना शस्त्रे देण्यास सुरुवात केली होती. अंगणात साप पाळल्यावर ते एक दिवस घरच्यांनाच डसतात. पाकिस्तान आज आपल्या जुन्या धोरणांचे फळ भोगत आहे, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी २०११ मध्ये अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी दिलेल्या इशाऱ्याची आठवण करून दिली.

SCROLL FOR NEXT