बीजिंग; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी चीनच्या तियानजिनमध्ये पार पडलेल्या शांघाय शिखर परिषदेनंतर त्यांच्या द्विपक्षीय बैठकीच्या ठिकाणी एकाच गाडीतून प्रवास केला. दोघांमध्ये एकांतात 50 मिनिटे चर्चा झाली.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘द’ वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी हा फोटो शेअर करत म्हटले की, शांघाय शिखर परिषदेच्या कार्यक्रमानंतर, राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि मी आमच्या द्विपक्षीय बैठकीच्या ठिकाणी एकत्र प्रवास केला. त्यांच्यासोबतची चर्चा नेहमीच अंतद़ृष्टी देणारी असते, असेही ते पुढे म्हणाले.
तत्पूर्वी, दिवसाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत शिखर परिषदेच्या निमित्ताने काही उत्साहपूर्ण क्षण घालवले. या तिन्ही नेत्यांनी हस्तांदोलन, आलिंगन आणि हास्याची देवाणघेवाण करत मैत्रीपूर्ण संबंधांचे दुर्मीळ दर्शन घडवले. यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ कमालीचे अस्वस्थ झाल्याचे पाहावयास मिळाले.
याशिवाय, पंतप्रधान मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष एका अनौपचारिक संवादात गुंतलेले असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या बाजूने चालत जाताना दिसले, यावेळी शरीफ एकटे पडल्याचे स्पष्ट दिसत होते. दोन्ही नेते उत्साहाने चर्चा करत असताना, शरीफ गंभीर चेहर्याने एकटेच उभे राहून त्यांना जाताना पाहत होते. यावेळी त्यांनी पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही.