Operation Sindoor Pakistan peace delegation
इस्लामाबाद : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानची जगासमोर पोलखोल करण्यासाठी भारताची सर्वपक्षीय शिष्टमंडळे विविध देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारताच्या प्रत्येक राजनैतिक पावलांची नक्केल पाकिस्तान करत आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर जगभरात झालेल्या बदनामीनंतर पाकिस्तानने आता आपली प्रतिमेला वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंचावर 'शांततेचा' संदेश देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे.
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानचा दहशतवादाशी असलेला संबंध जगासमोर उघड झाला. भारत सरकारने सर्व पक्षीय खासदारांची शिष्टमंडळे तयार करून जगभरातील प्रमुख देशांना भारताचा दहशतवादविरोधी संदेश पोहोचवण्याची घोषणा केली. यानंतर पाकिस्ताननेही घाईघाईने 'शांततेचा' प्रचार करण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी शनिवारी सांगितले की पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी भारत-पाकमधील तणावाच्या वाढत्या प्रकरणावर पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांना सोपवली आहे. पंतप्रधान शरीफ यांनी आज माझ्याशी संपर्क साधला, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेसाठी पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची विनंती केली. ही जबाबदारी स्वीकारण्याचा आणि या आव्हानात्मक काळात पाकिस्तानची सेवा करण्यास वचनबद्ध राहण्याचा मला सन्मान वाटतो, असे झरदारी यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
भुट्टो झरदारी यांच्या शिष्टमंडळाला कठीण संघर्षाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कारण, दहशतवादाला आळा घालण्यात पाकिस्तानला अपयश आले आहे. ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर म्हणून भारतीय नागरिकांना लक्ष्य करून केलेल्या प्रत्युत्तरात्मक कृतींमुळे पाकिस्तानची विश्वासार्हता कमी झाली आहे. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान दहशतवादाला दीर्घकाळापासून पाठिंबा देत असल्याची प्रतिमा अधिक स्पष्ट झाली आहे. कलंकित झालेली प्रतिष्ठा दुरुस्त करण्यासाठी पाक धडपडत आहे.
ऑपरेशन सिंदूर आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताच्या लढाईच्या संदर्भात केंद्र सरकार सर्वपक्षीय खासदारांची ७ शिष्टमंडळे पाठवणार आहे. या महिन्याच्या अखेरीस ही शिष्टमंडळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह प्रमुख देशांना भेट देणार आहे. यासाठी या शिष्टमंडळांचे नेतृत्व करणाऱ्या खासदारांच्या नावांची घोषणा सरकारने शनिवारी केली. यामध्ये ४ शिष्टमंडळांचे नेतृत्व सरकारमधील पक्षांचे खासदार करणार आहेत, तर ३ शिष्टमंडळांचे नेतृत्व विरोधी पक्षांच्या खासदारांकडे आहे. काँग्रेस नेते शशी थरूर, भाजप नेते रविशंकर प्रसाद, जेडीयू नेते संजय कुमार झा, भाजपचे बैजयंत पांडा, द्रमुक नेते कनिमोझी करुणानिधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, या शिष्टमंडळांचे नेतृत्व करणार आहेत.