इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची नाचक्की करून घेतली आहे. गेल्या 11 महिन्यांत तब्बल 40 देशांनी त्यांच्या देशातून 52 हजार पाकिस्तानी नागरिकांना हाकलून दिले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी 34 हजार नागरिक परदेशात भीक मागताना पकडले गेले आहेत. पाकिस्तानची मित्र राष्ट्रे असलेल्या सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) या देशांनी सर्वाधिक पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवले आहे.
हम न्यूज पाकिस्तानचे पत्रकार जाहिद गिशकोरी यांनी ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, दररोज सरासरी 155 पाकिस्तानी नागरिकांना वेगवेगळ्या देशांमधून परत पाठवले जात आहे. पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने दिलेल्या आकडेवारीनुसार, या वर्षाच्या 11 महिन्यांत 52 हजार पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी करण्यात आली. यातील चिंताजनक बाब म्हणजे कमीत कमी 34 हजार पाकिस्तानी नागरिक परदेशात भीक मागत होते. त्यांना पकडून पाकिस्तानात परत पाठवण्यात आले.
सौदी अरेबियातून 24 हजारांची हकालपट्टी
पाकिस्तानचा मित्र देश असलेल्या सौदी अरेबियाने सर्वाधिक म्हणजे तब्बल 24 हजार पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढले आहे. यातील बहुतेकजण तिथे भीक मागताना पकडले गेले. याचप्रमाणे दुबई, अबू धाबी व संयुक्त अरब अमिरातीच्या इतर भागांतून 6,000 हून अधिक पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात आले. याशिवाय कतार, बहरीन, ओमान आणि कुवेत या देशांनीही मोठ्या संख्येने पाकिस्तानी नागरिकांना बेकायदेशीर कामांमध्ये सामील असल्याच्या आरोपाखाली परत पाठवले आहे.
बेकायदेशीर कामांमध्ये सहभाग
अनेक पाकिस्तानी नागरिक व्हिजिट व्हिसावर परदेशात जातात आणि तिथेच बेकायदेशीरपणे वास्तव्य करतात. गेल्या काही काळात सुमारे 21 हजार पाकिस्तानी नागरिकांनी वेगवेगळ्या देशांमध्ये आश्रय घेण्यासाठी अर्ज केला आहे. मागील 5 वर्षांत मध्य पूर्व आणि आखाती देशांमधून 54 हजारहून अधिक पाकिस्तानी नागरिकांना भीक मागण्याच्या आरोपाखाली परत पाठवण्यात आले आहे, ही बाबही समोर आली आहे.
बनावट फुटबॉल क्लब
ही सर्व धक्कादायक माहिती एफआयएने संसदीय समितीसमोर सादर केली आहे. एफआयएच्या महासंचालकांनी सांगितले की, पाकिस्तानी नागरिक इथिओपिया, झांबिया किंवा झिम्बाब्वेसारख्या आफ्रिकन देशांमध्येही जात आहेत आणि तिथूनही त्यांना परत पाठवले जात आहे. बनावट पाकिस्तानी फुटबॉल क्लब तयार करून काही तरुणांना जपानला पाठवण्यात आल्याची घटनाही उघडकीस आली आहे.