LeT chief Hafiz Saeed Latest news
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईदच्या सुरक्षेत जवळपास चार पट वाढ केली आहे. हाफिज सईद हा पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील मास्टरमाईंड मानला जात आहे. पहलगाम हल्ल्यानंतर गुप्त कारवाई होण्याच्या भीतीने आयएसआय आणि पाकिस्तान सरकारने हाफिजची सुरक्षा वाढवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
द टाईम्स ऑफ इंडियाने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, त्याच्या सुरक्षेसाठी स्पेशल सर्व्हिस ग्रुपमधील माजी कमांडोंना तैनात करण्यात आले आहे. लाहोरमधील मोहल्ला जोहर येथील त्याच्या निवासस्थानी अतिरिक्त कर्मचारीही तैनात केले आहेत. विशेष म्हणजे त्याला जाणीवपूर्वक दाट लोकवस्ती असलेल्या भागात ठेवले आहे. जिथे सामान्य पाकिस्तानी नागरिकांच्या घरांसह मशीद आणि मदरसा आहेत.
सईदचा सध्या पाकिस्तान सरकारच्या तथाकथित कोठडीत मुक्काम आहे. सात दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणांत त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. तो ४६ वर्षांची शिक्षा भोगत आहे. पण तो केवळ कागदोपत्री शिक्षा भोगत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
त्याच्या राहत्या घराला तात्पुरत्या स्वरुपाच्या सब-जेलचे स्वरुप देण्यात आले आहे. त्याच्या घराच्या ४ किलोमीटर परिघातात जेश्चर डिटेक्शन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सर्व हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. त्यासाठी एक नियंत्रण कक्षदेखील उभारण्यात आला आहे.
त्याच्या घराच्या परिसरात कोणत्याही नागरिकाला प्रवेश दिला जात नाही. तसेच परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
७७ वर्षीय हाफिज पहलगाम हत्याकांडासह २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड असून तो अमेरिका आणि भारताला हवा आहे. पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी 'लष्कर-ए-तोयबा'च्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या संघटनेने स्वीकारली आहे. दरम्यान, भारत सरकारने या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात कारवाईसाठी पावले उचलली आहेत. यामुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे.
पहलगाम हल्ल्यामध्ये प्रामुख्याने विदेशी दहशतवाद्यांचा समावेश असून, त्यांना काश्मीरमधील स्थानिक दहशतवादी व ओव्हरग्राऊंड वर्कर्सकडून मदत मिळाल्याचे सुरक्षा यंत्रणांनी म्हटले आहे. हाफिज सईद हाच या दहशतवाद्यांचा प्रमुख 'हँडलर' असल्याची माहिती समोर आली आहे.