इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) हिंसक अशांततेच्या काही आठवड्यांनंतर या प्रदेशात पुन्हा एकदा आंदोलनाची लाट उसळली आहे. यावेळी जनरेशन झेड (जेन झी) म्हणजेच बहुतेक विद्यार्थी, शैक्षणिक सुधारणांवरून हे आंदोलन करत आहेत. तथापि, वाढती फी आणि मूल्यांकन प्रक्रियेविरोधात सुरू झालेले हे शांततापूर्ण आंदोलन आता शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात व्यापक आंदोलनात बदलले आहे, जे या अशांत प्रदेशातील जनरेशन झेडमधील वाढता असंतोष उघड करत आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला सुरू झालेली निदर्शने बहुतेक शांततापूर्ण होती; परंतु एका अज्ञात बंदूकधार्याने विद्यार्थ्यांच्या गटावर गोळीबार करून एका विद्यार्थ्याला जखमी केले, त्यानंतर गोंधळ उडाल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये मुझफ्फराबादमध्ये एक व्यक्ती आंदोलकांवर गोळीबार करताना दिसत आहे, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना पोलिसांच्या उपस्थितीत घडल्याचे वृत्तात म्हटले आहे. ‘इंडिया टुडे’ या व्हिडीओच्या सत्यतेची पुष्टी करू शकले नाही. या मुद्द्याचे पडसाद लाहोरसारख्या पाकिस्तानी शहरामध्येही उमटले, जिथे गेल्या महिन्यात इंटरमिजिएटच्या विद्यार्थ्यांनी लाहोर प्रेस क्लबबाहेर धरणे आंदोलन केले होते.
या घटनेने आंदोलनाला एक निर्णायक वळण दिले; कारण संतप्त विद्यार्थ्यांनी टायर जाळले, जाळपोळ आणि तोडफोड केली आणि पाकिस्तान सरकारविरोधात घोषणाबाजी केली - जे नेपाळ आणि बांगला देश या दक्षिण आशियाई राष्ट्रांमधील जनरेशन झेडच्या आंदोलनांसारखेच होते.