Abdul Basit statement
इस्लामाबाद : " जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला, तर आम्ही कोणताही विचार न करता भारत, मुंबई आणि नवी दिल्लीवर हल्ला करू. आम्ही त्यांना सोडणार नाही, पुढे काय होईल ते नंतर पाहू," अशा शब्दांमध्ये पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी गरळ ओकली आहे. एकीकडे पाकिस्तानचे शेजारील देश अफगाणिस्तानसोबतचे संबंध ताणलेले असताना बासित यांच्यासारख्या व्यक्तीने भारतातील महत्त्वाच्या शहरांवर थेट हल्ला करण्याच्या उल्लेखामुळे याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
एका चर्चेदरम्यान बासित म्हणाले की, “अमेरिकेने आमच्या अणुशस्त्रांना लक्ष्य केल्यास, आम्ही दिल्ली आणि मुंबईवर बॉम्बफेक करू. जर कोणी आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर पाकिस्तानकडे भारतावर जिथे हवे तिथे हल्ला करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही,” अशी वल्गना करत, आम्हाला असे व्हावे असे वाटत नाही आणि भारतालाही ते नको आहे, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत. दरम्यान, बासित यांनी थेट मुंबई आणि नवी दिल्लीच्या उल्लेखामुळे या विधानाची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असून, अशा प्रक्षोभक विधानांच्या परिणामांबाबत वादविवाद सुरू झाले आहेत.
अब्दुल बासित हे भारतासाठी नवीन नाहीत. त्यांनी २०१४ ते २०१७ या काळात नवी दिल्लीत पाकिस्तानचे उच्चायुक्त म्हणून काम केले आहे. हा काळ दोन्ही देशांमधील संबंधांच्या दृष्टीने अत्यंत क्लिष्ट होता. भारताशी थेट राजनैतिक संबंध हाताळलेल्या व्यक्तीने असे प्रक्षोभक विधान केल्यामुळे या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे.
बासित यांनी थेट मुंबई आणि नवी दिल्लीवर हल्ला करण्याची केलेली भाषा ही शेजारील देश अफगाणिस्तानसोबतचे संबंध ताणलेले असताना आलेली आहे. दरम्यान, तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी दावा केला आहे की, या हल्ल्यांमध्ये पुनर्वसन केंद्रासह नागरी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात मोठे नुकसान आणि जीवितहानी झाली आहे. बासित यांनी केलेल्या विधानावर अद्याप भारत सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, तरीही विविध व्यासपीठांवर यावर जोरदार चर्चा सुरू आहे.