Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील वातावरण सध्या तणावपूर्ण बनलं आहे. पाकिस्तानच्या एअर स्ट्राईकनंतर अफगाणिस्तान तालिबाननं देखील प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानंतर पाकिस्तानने पुन्हा काबुल, कंधार आणि पक्तियासह अनेक ठिकाणी हल्ला केला. यादरम्यान, एअरस्ट्राईकसाठी घुसलेल्या असीम मुनीरच्या सैन्याला मोठा झटका बसला आहे. अफगाणिस्तानने एक पाकिस्तानी फाटर जेट पाडल्याचा दावा केला जातोय. याचबरोबर अफगाणिस्ताननं नव्या संघर्षात ४० पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केला असून १५ जवानांना ताब्यात देखील घेतलं आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तालिबानविरूद्ध खुलं युद्ध अशा शब्द प्रयोगाचा वापर करून आगीत तेल ओतलं आहे. त्यामुळं दोन्ही देशांच्या सीमेवर परिस्थिती गंभीर झाली आहे. अफगाणिस्तान माध्यम टोलो न्यूजने दावा केला आहे की तालिबान लष्करानं पाकिस्तानचे एक फायटर जेट पाडलं आहे. हे फायटर जेट कोणतं आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. माध्यामांमध्ये एफ १६ फायटर जेट पाडल्याचा दावा केला जातोय. हे विमान अफगाण हवाई हद्दीत पाडण्यात आलं आहे. पाकिस्तानने या दाव्यावर अजूनपर्यंत तरी कोणती अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
शुक्रवारी काबुलमध्ये जवळपास तीन स्फोटांचा आवाज ऐकू आला होता. मात्र हल्ला नेमका कुठं झाला आणि किती नुकसान झालं याची माहिती मिळालेली नाही. तालिबान सरकारचे प्रवक्ता तबीहुल्लाह मुजाहीद यांनी सांगितलं की पाकिस्ताननं कंधार आणि दक्षिण पूर्व प्रांतात हवाई हल्ले केले.
असोसिएट प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानी संरक्षण सूत्रांनी सांगितलं की पाकिस्तानच्या लष्करानं काबुल, कंधार आणि पक्तिया या अफगाणी भागातील लष्करी तळांना टार्गेट केलं होतं. या हल्ल्यात ब्रिगेड बेस नेस्तनाभूत झाल्याचा दावा केला जातोय. मात्र या हल्ल्यात किती लोकांनी जीव गमावला याबाबत माहिती मिळालेली नाही.
पाकिस्तानच्या अनेक पोस्टवर कब्जा
दुसरीकडे अफगाणिस्तानने दावा केला की रविवारी सीमा भागात झालेल्या पाकिस्तानी हवाई हल्ल्याचा बदला गुरूवारी रात्री घेण्यात आला. पाकिस्तानच्या सीमेवर प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्यात आली. अफगाणिस्ताननं दावा केला की त्यांनी १२ पेक्षा जास्त पाकिस्तानी लष्करी छावण्यांवर कब्जा केला आहे. तालिबान समर्थक माध्यमांनी सांगितलं की दोन लष्करी तळ आणि १९ पोस्टवर अफगाणिस्ताननं नियंत्रण मिळवलं आहे. यात ५५ सौनिक मारले गेले आहेत.
पाकिस्ताननं काय म्हणतंय?
पाकिस्तान सरकारनं अफगाणिस्तानचा हा दावा फेटाळला लावला. पाकिस्तानचे सूचना मंत्री अताउल्लाह तरार यांनी सांगितलं की दोन पाकिस्तानी सैनिक मारले गेले असून तीन जखमी आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानचे ३६ लडाकू मारले गेल्याचा दावा केला.
सध्या दोन्ही देश दावा प्रतिदावा करत आहेत. त्यामुळं पाकिस्तान - अफगाणिस्तान सीमेवर परिस्थिती नाजूक झाली आहे. दोन्ही देशांनी केलेल्या दाव्याला स्वतंत्र पुष्टी मिळालेली नाही. मात्र यामुळं दोन्ही देशांचा लष्करी हालचाली वाढल्या असून या भागात मोठा लष्करी संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.