आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानच्या वॉर म्युझियममध्ये विंग कमांडर अभिनंदन यांचा पुतळा 

Pudhari News

पुढारी ऑनलाईन डेस्क 

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा पुतळा पाकिस्तानने आपल्या वॉर म्युझियममध्ये ठेवला आहे. याबाबतचा फोटो पाकिस्तानमधील पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अन्वर लोधी यांनी ट्विटरवर पोस्ट केला. बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी लढाऊ विमानांशी झालेल्या डॉग फाईटमध्ये अभिनंदन यांचे विमान पाक व्याप्त काश्मीरमध्ये पडले होते आणि त्यांना पाकिस्तानने आपल्या ताब्यात घेतले होते. पण, त्यांना दोन दिवसांनी त्यांना अटारी – वाघा बॉर्डरमार्गे पुन्हा भारतात पाठवण्यात आले होते. 

पाकिस्तानने त्यांच्या कराची येथील वॉर म्युझियममध्ये भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा पुतळा ठेवला आहे. याबाबतचा फोटो पत्रकार अन्वर लोधी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी 'पाकिस्तान एअर फोर्सने अभिनंदन यांचा पुतळा म्युझियममध्ये ठेवला आहे. जर त्यांनी तो उत्तम चहाचा कप ठेवला असता तर हे प्रदर्शन फारच रोचक झाले असते.' असे लिहिले. ज्यावेळी अभिनंदन याच्याशी पाकिस्तानी आर्मीचे अधिकारी चौकशी करत होते त्यावेळी त्यांना एक चहाचा कप दिला होता. त्यावेळी त्या अधिकाऱ्याच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना अभिनंदन यांनी चहा चांगला असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानी हवाई दलाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. लोधी यांचे हे वक्तव्य याच संदर्भात होते. 

पाकिस्तानने या आधीही अभिनंदन यांचा वापर वर्ल्डकपमधील भारत – पाक सामन्यादरम्यान जाहिरातीसाठी केला होता. त्यावेळी सोशल मीडियावर त्यांच्यावर चांगलीच टीका झाली होती. पाकिस्तान कायमच आपण शांतता राखण्याच्या बाजूने  कसे आहोत याचा कांगावा करत असते. पाकचे एफ १६ लढाऊ विमान पाडल्यानंतर अभिनंदन यांचे विमान पाक व्याप्त काश्मीरमध्ये पडले होते. पण, त्यावेळी अभिनंदन सुरक्षित इजेक्ट करण्यात यशस्वी झाले होते. नंतर त्यांना पाकिस्तानी आर्मीने ताब्यात घेऊन लगेचच दोन दिवसात भारताकडे सोपवले होते. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT