इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानने गुरुवारी ‘फताह-3’ या नव्या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचे अनावरण केले. चीनच्या एचडी-1 क्षेपणास्त्र तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या प्रणालीला भारताच्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राला उत्तर म्हणून सादर करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या वर्षी भारत-पाकिस्तानदरम्यान झालेल्या चार दिवसांच्या संघर्षाच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त हे क्षेपणास्त्र सार्वजनिकरीत्या प्रदर्शित करण्यात आले. यामुळे चीन आणि पाकिस्तान यांच्यातील वाढते संरक्षण सहकार्य पुन्हा अधोरेखित झाले आहे.
फताह-3 हे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याचा दावा केला आहे. या क्षेपणास्त्राचा अंतिम वेग मॅक 2.5 ते मॅक 4 दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीच्या अतिशय जवळून किंवा समुद्रसपाटीला चिकटून उड्डाण करू शकते. त्यामुळे रडारला ते ओळखणे आणि त्यावर वेळेत प्रतिक्रिया देणे अत्यंत कठीण होते. पारंपरिक हवाई संरक्षण यंत्रणांच्या प्रतिसादाचा कालावधी कमी करण्याची क्षमता या प्रणालीत असल्याचा दावा केला जात आहे.
चीनने गेल्या काही वर्षांत पाकिस्तानला लष्करी तंत्रज्ञान, ड्रोन, हवाई संरक्षण प्रणाली आणि क्षेपणास्त्र विकासात मोठी मदत केली आहे. विशेष म्हणजे, भारताच्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राला आशियातील सर्वात प्रभावी सुपरसॉनिक स्ट्राईक सिस्टीम मानले जाते. त्यामुळे पाकिस्तानकडून फताह-3 चे सादरीकरण हे सामरिक संतुलन साधण्याचा प्रयत्न मानला जात आहे.