इस्लामाबाद; वृत्तसंस्था : इराण व अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर मोठा नेता बनण्याचा प्रयत्न करणारा पाकिस्तान आता आपल्याच देशवासीयांना लॉकडाऊनच्या छायेत ढकलण्याच्या तयारीत आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमतींनी हैराण असलेल्या पाकिस्तानात शाहबाज सरकार जनतेवर पेट्रोलचा वापर कमी करण्यासाठी दबाव आणत असून, त्यातूनच सरकारने सरकारी व खासगी कार्यालये आठवड्यातून तीन दिवस बंद ठेवण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे.
पाकिस्तानातील 'डॉन'च्या बातमीनुसार, शाहबाज सरकारने सरकारी व खासगी कार्यालयांत आठवड्यातून ४ दिवस काम करण्याच्या प्रस्तावावर चर्चा केली आहे. या प्रस्तावानुसार शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस कार्यालये बंद राहतील. पश्चिम आशियातील लष्करी संघर्ष व सौदी अरेबियाच्या तेल पायाभूत सुविधांवर हुथी बंडखोरांचा हल्ला यामुळे आखाती देशांत कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. याचा मोठा फटका पाकिस्तानला बसत आहे. यातूनच शाहबाज सरकार आपला वाढता आर्थिक भार कमी करण्यासह इंधनाच्या बचतीसाठी 'स्मार्ट लॉकडाऊन' लागू करण्याचा विचार करत आहे. नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोलच्या वाढत्या किमतींचा ताण कमी करण्यासाठी वाहतूक व इंधनाचा वापर मर्यादित करण्याच्या विविध पर्यायांवर चर्चा झाली.
महागाईचा भडका
पेट्रोलच्या दरवाढीने जनता हैराण असतानाच मंगळवारी पुन्हा 'इंधन बॉम्ब' फोडण्यात आला. पेट्रोल ४.१० पाकिस्तानी रुपयांच्या दरवाढीसह ३८४.३४ रुपये प्रतिलिटर, तर डिझेल ६.४१ रुपयांच्या वाढीसह ४१५.८३ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले. महागाईमुळे जनता त्रस्त झाली असून सरकारला इंधनाचा वापर रोखण्यासाठी 'स्मार्ट लॉकडाऊन'शिवाय दुसरा मार्ग दिसत नसल्याचे चित्र आहे.
‘या’ उपाययोजनांवर विचार सुरू
सरकारी व खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ४ दिवस काम
शुक्रवार, शनिवार व रविवारी कार्यालये बंद
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'ऑड-इव्हन'सारखी रोटेशन पद्धत लागू करण्याची चर्चा
सरकारी व खासगी वाहनांची संख्या निम्म्याने कमी केली जाण्याची शक्यता
आठवड्यातून ३ दिवस बाजारपेठा बंद, दुकानांच्या वेळा कमी करणे विचाराधीन
हे प्रस्ताव सध्या चर्चेच्या टप्प्यात, अद्याप अंतिम धोरण निश्चित होणे बाकी
सरकार या प्रस्तावांवर लवकरच अंतिम निर्णय घेण्याची शक्यता
मंत्र्यांची परस्परविरोधी विधाने
या मुद्द्यावर शाहबाज सरकारच्या मंत्र्यांनी वेगवेगळी विधाने करीत गोंधळ वाढवला आहे. संसदीय कामकाजमंत्री डॉ. तारिक फझल चौधरी यांनी स्मार्ट लॉकडाऊनचे वृत्त फेटाळताना ही बैठक केवळ पेट्रोलच्या वाढत्या किमती व वापराबाबत होती, असे वक्तव्य केले, तर माहितीमंत्री अताउल्लाह तरार यांनी इंधन वापर घटवण्यासाठी जुने नियम पुन्हा लागू करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगत आखाती देशांतील तणावामुळे पुरवठा खंडित होत असल्याचे मान्य केले.