पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमधील बलुचिस्तानच्या पिशीन जिल्ह्यात एका बाजारपेठेत बॉम्बस्फोट झाला. यात दोन मुलांसह तिघांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानमधील बलुचिस्तानच्या पिशीन जिल्ह्यात बाजारपेठेत शनिवारी (दि.२४) स्फोट झाला. यात दोन मुले आणि एक महिला ठार झाली. तर दोन पोलिसांसह १३ लोक जखमी झाले आहेत. असे वृत्त डॉन या वृत्तसंस्थेने रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.
जखमींपैकी १३ जणांना रुग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात आले, पाच जखमींची प्रकृती गंभीर असून दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोन पीडितांना ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिशीन सिटी स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) मुजीबूर रहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जखमी पोलिसांची प्रकृती चिंताजनक आहे.
एसएचओ रहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटक साहित्य मोटरसायकलमध्ये पेरण्यात आले होते. परिणामी तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. दहशतवादविरोधी विभाग (CTD) आणि बॉम्ब निकामी पथक तपासासाठी पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले, असे अधिकाऱ्याने सांगितले.