नवी दिल्ली : पाकिस्तानात अमर्याद अधिकार मिळाल्यानंतर सर्वोच्च शक्तिशाली झालेले लष्करप्रमुख असिम मुनीर यांनी त्यांची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत केली आहे. हुकूमशहा बनण्याच्या वाटेवर असलेले सैन्य प्रमुख असिम मुनीर सातत्याने भीतीच्या छायेखाली जगत आहेत. मुनीर यांना त्यांची अवस्था पाकचे माजी नेते जिया उल हक यांच्यासारखी होण्याची भीती सतावत आहे. त्यामुळे झोपतानाही ते बुलेटप्रूफ जॅकेट घालत असल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नाही, तर नेहमी घरात भरलेली पिस्तूल आणि रायफल ठेवत आहेत.
पाकिस्तानच्या संसदेने असिम मुनीर यांना फिल्ड मार्शल पद दिले आहे. याशिवाय ते तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आहेत. पाकिस्तानची अण्वस्त्रेही मुनीर यांच्याच अधिपत्याखाली आहेत. त्यामुळे आजघडीला मुनीर पाकमधील सर्वात महत्त्वाचे व्यक्ती आहेत. तथापि, त्यांना आता जिया उल हक यांच्यासारखी त्यांची गत होण्याची भीती सतावत आहे. 1988 मध्ये जिया उल हक यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. ते आधी लष्करप्रमुख होते. नंतर त्यांनी पाकची सत्ता हस्तगत केली. पाकिस्तानने हा तांत्रिक बिघाडाने झालेला अपघात असल्याचे म्हटले होते. परंतु हा तांत्रिक बिघाड जाणीवपूर्वक केल्याची चर्चा होते.
मुनीर यांनी त्यांच्या सुरक्षेतून ट्रेनिंग ऑफिसरना हटवले आहे. मुनीर यांचा प्रशिक्षणार्थी ऑफिसर्सवर विश्वास नाही. इम्रान खान यांचे माजी सल्लागार शहशाद अकबर यांच्या मते मुनीर यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी जुने आणि इमानदार जवान तैनात केले आहेत. तथापि, मुनीर सर्वाधिक घाबरले असून त्यांनी स्वस्त:च कायदा बदलून स्वत:ला सर्वाधिक ताकद बहाल केली आहे, अशी टीकाही शहशाद अकबर यांनी केली आहे.
पीटीआय पक्षाच्या या नेत्याच्या मते मुनीर यांना सर्वाधिक भीती परदेशातील पाकिस्तानी नागरिकांच्या टीकेची आहे. मुनीर पाकिस्तानच्या कराच्या पैशाचा वापर करून परदेशात स्वस्त:साठी लॉबिंग करत आहे. त्यांच्या या दाव्यांना पाकिस्तानचे पत्रकार मोईद पीरजादा यांनीही योग्य ठरवले आहे. पीरजादा यांनी सांगितले की, मुनीर नेहमी स्वत:जवळ गोळ्यांनी भरलेले पिस्तूल बाळगत आहेत.
सैन्य प्रमुख म्हणून मुनीर यांना पाकिस्तानात व्हीआयपी सुरक्षा मिळते. त्या अंतर्गत मुनीर यांची सुरक्षा व्यवस्था चारपदरी आहे. पहिल्या लेअरमध्ये स्पेशल सिक्युरिटी डिव्हिजनचे जवान तैनात असतात. पाकिस्तानच्या या युनिटमध्ये 15 हजार जवान आहेत. मात्र मुनीर यांच्या सुरक्षेसाठी या युनिटचे नेमके किती जवान तैनात आहेत याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.