काबूल; वृत्तसंस्था : युद्धबंदीचे उल्लंघन करून पाकिस्तानने शुक्रवारी रात्री उशिरा अफगाणिस्तानात आणखी हवाई हल्ले केले असून यात अफगाणिस्तानच्या तीन युवा क्रिकेटपटूंसह दहाजण ठार, तर सातजण जखमी झाले आहेत.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष 9 ऑक्टोबर रोजी सुरू झाला. बुधवारी जाहीर झालेला 48 तासांचा युद्धविराम शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता संपला. तो वाढवण्यासाठी एक करार झाला. तथापि काही तासांनंतरच पाकिस्तानने पक्तिका प्रांतात हवाई हल्ला केला. अफगाणिस्तानातील मीडिया आऊटलेट टोलो न्यूजनुसार, दोन्ही देशांमधील सीमेवरील डुरंड रेषेजवळ असलेल्या उरगुन आणि बारमल जिल्ह्यांमधील अनेक घरांना लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात तीन पाकिस्तानी क्लब क्रिकेटपटू ठार झाले. याशिवाय दोन मुलांसह एकूण 10जणांचा मृत्यू झाल्याचे तर 7 नागरिक जखमी झाल्याचे एएफपी या वृत्तसंस्थेने म्हंटले आहे.
यासंदर्भात तालिबानने दावा केला आहे की, पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात हे हवाई हल्ले केले. जेथे हल्ले करण्यात आले ते ठिकाण दोन्ही देशांच्या सीमेजवळ आहे. अफगाणिस्तानातील वृत्तवाहिनी ‘टोलो न्यूज’च्या मते, या हल्ल्यात अर्गुन आणि बारमल जिल्ह्यांमधील अनेक घरांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानच्या बॉम्ब हल्ल्यांच्या भीतीने अफगाणिस्तानच्या कंदाहार प्रांतातील स्पिन बोल्दक भागातून सुमारे 20 हजार कुटुंबे विस्थापित झाली असून, त्यांनी वाळवंटात आणि तात्पुरत्या छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे.
प्रत्युत्तर देण्याचा आम्हाला अधिकार : तालिबानचा इशारा
पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या भूमीवर केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. पण दोहा येथे सुरू असलेल्या शांतता चर्चेमुळे आम्ही सध्या संयम राखला आहे, असा स्पष्ट इशारा तालिबानने दिला आहे.
तालिबानच्या प्रवक्त्याने सांगितले की, दोहामध्ये आमचे शिष्टमंडळ चर्चेसाठी गेले असल्यामुळे आम्ही आमच्या सैन्याला कोणतीही नवीन कारवाई करण्यापासून रोखले आहे. अफगाणिस्तान शांतता आणि स्थिरतेसाठी कटिबद्ध आहे. परंतु सध्याची परिस्थिती पूर्णपणे पाकिस्तानच्या आक्रमकतेचा परिणाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दोहा येथे शांती चर्चा, पण वातावरण तणावपूर्ण
दोन्ही देशांचे प्रतिनिधी सध्या दोहा येथे शांती चर्चेसाठी भेटत आहेत. मात्र सततच्या हल्ल्यांमुळे चर्चेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना उत्तर देण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. पण सध्या चर्चेला प्राधान्य दिले आहे.