Pakistan Ishaq Dar slip video
इस्लामाबाद: पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्यासोबत रविवारी एका कार्यक्रमादरम्यान एक विचित्र प्रसंग घडला. इजिप्तचे परराष्ट्र मंत्री बद्र अब्देलाती यांचे स्वागत करण्यासाठी जात असताना दार यांचा तोल जाऊन ते अचानक जमिनीवर पडले. मात्र, जवळच असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने सावरले.
इस्लामाबादमधील परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी पुढे गेलेल इशाक दार यांचा पाय अचानक घसरला आणि ते खाली पडले. यामध्ये त्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून, त्यानंतरचे सर्व कार्यक्रम नियोजित वेळापत्रकानुसार पार पडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तान एका महत्त्वाच्या 'चतुष्कोणीय' बैठकीचे यजमानपद भूषवत असताना ही घटना घडली. या बैठकीत पाकिस्तानसह इजिप्त, तुर्की आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री सहभागी झाले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव कमी करण्यासाठी आणि दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला आहे. अमेरिका आणि इराण या बैठकीत थेट सहभागी नसले तरी, राजनैतिक वर्तुळात या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही शत्रू राष्ट्रांमधील संवादाचे हे पहिले पाऊल मानले जात आहे.
इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण या युद्धात मध्यस्थी करण्याची तयारी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी अगोदरच दर्शवली होती. सध्या पाकिस्तान पडद्याआड राहून शांतपणे आपले काम करत आहे. अमेरिकेने मांडलेला १५-कलमी प्रस्ताव गुप्तपणे इराणपर्यंत पोहोचवण्यात पाकिस्तानने मदत केली आहे. दोन्ही देश जाहीरपणे आपापल्या भूमिकांवर ठाम असले, तरी चर्चेची प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरत आहे.
दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध पुकारलेल्या युद्धात भारताने मध्यस्थी करावी, असा सूर उमटला होता मात्र, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितले की, इजिप्त, तुर्कस्तानसह पाकिस्तान व अन्य देश वॉशिंग्टन आणि तेहरानमध्ये मध्यस्थ म्हणून काम करण्याची धडपड करत आहेत. परंतु भारत स्वतःला पाकिस्तानप्रमाणे दलाल मानत नाही.