पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये गेल्या २४ तासांमध्ये झालेल्या चकमकीत २३ दहशतवाद्यांसह १८ सुरक्षा कर्मचारी ठार झाले आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी शनिवारी बलुचिस्तानला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) माहितीनुसार, बलुचिस्तानच्या विविध भागात दहशतवाद्यांविराेधात कारवाई करण्यात आली. हरनाई जिल्ह्यात झालेल्या कारवाईत ११ दहशतवादी ठार झाले. अनेक दहशतवाद्यांचे अड्डेही उद्ध्वस्त करण्यात आले. तत्पूर्वी, शुक्रवारी रात्री, कलाटच्या मंगोचर भागात रस्ता रोखण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न सुरक्षा दलांनी उधळून लावत १२ दहशतवाद्यांना ठार केले.
बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांवर नियमितपणे हल्ले होत आहेत. बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे, परंतु इतर प्रांतांपेक्षा जास्त संसाधने असूनही, तो सर्वात कमी विकसित आहे. गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत एकूण २३ दहशतवादी ठार असून यापुढे कारवाई सुरुच राहणार असल्याचे पाकिस्तान लष्कराने म्हटलं आहे. दरम्यान, बंदी घातलेल्या दहशतवादी गट तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने सरकारसोबतचा युद्धविराम मोडल्यापासून दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. २०२४ मध्ये आतापर्यंत ४४४ दहशतवादी हल्ल्यांमध्ये सुरक्षा दलाचे ६८५ कर्मचारी ठार झाले आहेत.