Ozzy Osbourne death
जगप्रसिद्ध रॉक गायक ओजी ऑस्बॉर्न यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७६व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ‘प्रिन्स ऑफ डार्कनेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओजी यांना २०१९ मध्ये पार्किन्सन आजार झाल्याचे समोर आले होते. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप जाहीर केलेले नाही.
ब्रिटिश हेवी मेटल बँड ब्लॅक सब्बाथ चे मुख्य गायक जॉन मायकेल ‘ओजी’ ऑस्बॉर्न हे प्रसिद्ध गायक आणि गीतकार होते. त्यांचा जन्म ३ डिसेंबर १९४८ रोजी मार्स्टन ग्रीन, युनायटेड किंगडम येथे झाला. १९७० च्या दशकात ब्लॅक सब्बाथ या बँडमध्ये प्रमुख गायक म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळवली आणि त्याच काळात ‘प्रिन्स ऑफ डार्कनेस’ हे टोपणनाव मिळाले.
मंगळवारी (दि.२२) ओजी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. केवळ दोन आठवड्यांपूर्वीच ओजी ऑस्बॉर्न यांनी ब्लॅक सब्बाथ या रॉक बँडच्या शेवटच्या मैफिलीमध्ये परफॉर्म केले होते. त्या कार्यक्रमाचे नाव होते ‘बॅक टू द बिगिनिंग’ आणि तो त्यांच्या गृहनगर बर्मिंघम, इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कॉन्सर्टमध्ये इतर अनेक दिग्गज कलाकारांनीही सहभाग घेतला होता. संगीत क्षेत्रात दीर्घ कारकीर्द गाजवणाऱ्या ओजी यांनी २०२० मध्ये प्रकृतीच्या कारणास्तव आपण पार्किन्सन आजाराने ग्रस्त असल्याचे सांगितले होते. ओजी ऑस्बॉर्न यांचे निधन हे संगीतसृष्टीसाठी मोठा धक्का ठरला आहे.