एक किलोचा पक्षी पाडतो दीड लाख किलोचे विमान Pudhari File Photo
आंतरराष्ट्रीय

एक किलोचा पक्षी पाडतो दीड लाख किलोचे विमान

अमेरिकेत दरवर्षी 15 हजारांवर बर्डस्ट्राईक; भारतात 1143

पुढारी वृत्तसेवा

सेऊल/नवी दिल्ली : रविवारी पहाटे साडेपाच वाजता दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर लँडिंगदरम्यान विमान संरक्षक भिंतीवर धडकून स्फोट झाला. धावपट्टीवर लँडिंग करताना विमानाची चाकेच उघडली नाहीत. त्याचे कारण म्हणजे पक्ष्याच्या धडकेमुळे गिअर सिस्टीममध्ये समस्या उद्भवली होती. एककिलोभर वजनाचा पक्षी दीड लाख किलो वजनाचे विमान पूर्णपणे नष्ट करू शकतो, हे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले. जेजू एअरच्या या विमानातील 179 लोक या दुर्घटनेत मारले गेले. किलोभर वजनाचा पक्षी जेव्हा विमानाला धडकतो तेव्हा प्रचंड न्यूटन फोर्स निर्माण होतो व हाच विमानाला मारक ठरतो. न्यूटन फोर्स हे बलाचे एक एकक आहे.

कसे घडते समजून घ्या...

0.365 मीटर बॅरल बंदुकीतून 40 ग्रॅमची गोळी सेकंदाला 700 मीटर वेगाने झाडली जाते तेव्हा ती 2,684 न्यूटन फोर्स तयार करते.

पक्ष्याचे विमानाला धडकणेही अगदी असेच आहे. एका अध्ययनानुसार, जेव्हा 1.8 किलो वजनाचा पक्षी प्रचंड वेगात असलेल्या विमानाला धडकतो तेव्हा 3.5 लाख न्यूटन फोर्स निर्माण होते.

म्हणजेच जेव्हा 1.8 किलो वजनाचा पक्षी विमानाला धडकतो, तेव्हा त्याचा परिणाम बुलेटच्या (बंदुकीच्या गोळीच्या) तुलनेत सुमारे 130 पट जास्त असतो.

एखादा पक्षी विमानाच्या टर्बाईनला आदळून विमानाच्या इंजिनमध्ये अडकल्यास अपघाताचा धोका वाढतो.

जेव्हा पक्षी विमानाच्या विंडशील्डवर आदळतो तेव्हा विंडशील्ड क्रॅक होते आणि केबिनमधील हवेचा दाब झपाट्याने कमी होऊ लागतो. हे किती भयंकर आहे.

विमानासाठी बर्ड स्ट्राईक किती धोकादायक ठरू शकतो, ही बाब पक्ष्याचे वजन, आकार, वेग, उड्डाणाची दिशा यावर अवलंबून असते.

आकडे बोलतात...

90% पक्ष्यांच्या हल्ल्याच्या घटना धावपट्टीच्या आसपास घडतात.

2016 ते 2021 दरम्यान, पक्ष्यांच्या धडकेची 68% प्रकरणे दिवसा नोंदवली गेली.

19% प्रकरणे याच कालावधीत रात्री नोंदवली गेली.

40 हजारांवर विमानांवर बर्ड स्ट्राईकच्या घटना दरवर्षी जगभरात घडतात.

1988 पासून जगभरात पक्ष्यांच्या हल्ल्यात 250 विमाने नष्ट झाली.

1.2 अब्ज डॉलरवर विमानांचे नुकसान पक्ष्यांच्या धडकेमुळे दरवर्षी होते.

14 हजारांहून अधिक पक्ष्यांच्या हल्ल्याच्या अमेरिकेत दरवर्षी घटना घडतात.

2023 मध्ये भारतात बर्ड स्ट्राईकच्या 1143 घटनांची नोंद आहे.

पहिली दुर्घटना

1912 मध्ये पायलट कार्ल हा अमेरिकेत समुद्रकाठावरून उडत असताना एका समुद्री गरुडाने विमानाला धडक दिली. त्यात कार्लचा मृत्यू झाला.

दुसरी दुर्घटना

1960 मध्ये बोस्टन लोगान विमानतळावरून उड्डाण घेत असताना पक्ष्यांच्या धडकेने चारही इंजिने बंद पडल्याने विमान कोसळले आणि 62 जणांचा मृत्यू झाला.

उपाय काय?

विमानतळाच्या आजूबाजूला पक्ष्यांचे थवे उडत असलतील तर

बर्ड स्ट्राईकची शक्यता वाढते. बहुतांश विमानतळाभोवती कीटकांची पैदास व्हायला नको, हे पाहिले पाहिजे.

विमानतळावर लाऊडस्पीकर सज्ज व्हॅन तैनात असाव्यात. पक्ष्यांना घाबरवण्यासाठी त्यावरून आवाज काढावेत. आपल्याकडे सुरत विमानतळावर पक्ष्यांना पळवून लावण्यासाठी लेझर लाईट किंवा लेझर गन वापरली जाते. पाकिस्तानात लाहोर विमानतळावर एकदा 12 बर्ड शूटर नेमले गेले होते.

2024 : 8 विमान अपघात; 402 ठार

1/2 : सरत्या वर्षाच्या सरत्या आठवड्यात कझाकिस्तान (25 डिसेंबर) आणि दक्षिण कोरियामध्ये (29 डिसेंबर) 2 विमान अपघातात 217 जण मरण पावले.

3 : 24 जानेवारी रोजी रशियन लष्करी विमान अपघातात 74 जण ठार झाले.

4 : 12 मार्च रोजी रशियातील इव्हानोवो येथे विमान अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला.

5 : 19 मे रोजी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर कोसळले होते. रायसींसह 9 जणांचा त्यात मृत्यू झाला.

6 : 10 जून रोजी मलावीच्या उपराष्ट्राध्यक्ष सॉलोस क्लाऊस चिलिमा यांचे विमान अपघातात निधन झाले.

7 : 24 जुलै रोजी नेपाळच्या काठमांडू येथे पोखराला जात असताना विमान क्रॅश झाले. 18 जणांना जीव गमवावा लागला.

8 : 9 ऑगस्ट रोजी ब्राझीलमध्ये झालेल्या अपघातात 62 जण मरण पावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT