आंतरराष्ट्रीय

उल्कापिंडाची पावशेर धूळ घेऊन ओसीरीस रेक्स यान परतले

दिनेश चोरगे

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था :  साडेचार अब्ज वर्षांपासून पृथ्वीभोवतील फिरणार्‍या बेन्नू या उल्कापिंडाचे 250 ग्रॅम कण व धूळ गोळा करून नासाचे ओसीरीस रेक्स यान रविवारी अखेर पृथ्वीवर सुखरूप परतले. पृथ्वीवर जीवसृष्टी कशी निर्माण झाली याचे गूढ या कण व धुळीच्या माध्यमातून लागेल, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.

अवकाशात 10 अब्ज वर्षांपूर्वी फिरणार्‍या एका उल्कापिंडाचा बेन्नू हा तुकडा आहे. तो मूळ उल्कापिंडापासून साडेचार अब्ज वर्षांपूर्वी तुटून वेगळा झाला. त्यानंतर तो वेगवेगळ्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाच्या तडाख्यात येत पृथ्वीच्या सर्वात जवळ पोहोचला. तो कायम फिरत असतो. दर सहा वर्षांनी तो पृथ्वीच्या अगदी जवळ येत असतो. 500 मीटर उंचीचे हे उल्कापिंड असून 1999 मध्ये नासाच्या लिनिअर या संशोधनात त्याचा पत्ता लागला. यानंतर त्याचे 2013 मध्ये बेन्नू हे नामकरण करण्यात आले.

सर्वात जुना उल्कापिंड असल्याने त्याच्या अभ्यासातून पृथ्वीवर जीवसृष्टी कशी निर्माण झाली याचा शोध घेता येईल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे होते. पृथ्वीवर उल्कापातातून जीवसृष्टी निर्माण झाली, असे सांगितले जाते. त्यामुळे या उल्कापिंडातून जीवसृष्टीआधीचे रासायनिक घटक समोर येण्याची शक्यता आहे. त्यासाठी नासाने 2017 मध्ये बेन्नूच्या मागावर ओसिरीस रेक्स हे यान सोडले होते. या यानाने बेन्नूचे कण आणि धूळ गोळा करायची होती. किमान 60 ग्रॅम धूळ व कण जमा केल्यास त्याचा प्रयोगशाळेत अभ्यास करणे शक्य होणार होते.
पण या यानाने तब्बल 250 ग्रॅम ऐवज गोळा केला असून 2021 मध्ये ते पृथ्वीवर परतीच्या प्रवासाला निघाले. रविवारी अमेरिकेच्या उटाह वाळवंटात ओसीरीस रेक्स यानाचे कॅप्सूल सुरक्षित उतरले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT