खतरनाक दहशतवादी ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन जिवंत असल्याची माहिती समोर आली आहे. (File Photo)
आंतरराष्ट्रीय

ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा जिवंत! ९/११ सारख्या हल्ल्याच्या तयारीत- रिपोर्ट

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

खतरनाक दहशतवादी ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन (Osama Bin Laden Son Hamza) जिवंत असून त्याने अल- कायदा दहशतवादी संघटनेचे नेतृत्व हाती घेतले आहे. तो अल- कायदाचा विस्तार करण्यासाठी सक्रिय झाला असून तो पाश्चात्य देशांवर हल्ल्याच्या तयारीत आहे, असे वृत्त द मिररने दिले आहे. हमजा सोबत त्याचा भाऊ अब्दुल्ला बिन लादेन देखील सक्रिय आहे. हमजा त्याचा भाऊ अब्दुल्ला बिन लादेनसह अफगाणिस्तानातून गुप्तपणे अल कायदाची सुत्रे हालवत आहे, असेही पुढे द मिररने विशेष रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

तालिबानविरोधी मिलिटरी फ्रंट नॅशनल मोबिलायझेशन फ्रंट (NMF) ने हमजा आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांचा सविस्तर तपशील असलेला एका रिपोर्ट तयार केला आहे. हमजा त्याच्या साथीदारांसह अफगाणिस्तानात तळ ठोकून असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यात हमजाचा "क्राउन प्रिन्स ऑफ टेरर" असा उल्लेख केला आहे. त्याच्या सुरक्षेसाठी ४५० स्नायपर्स सतत तैनात असतात. तो उत्तर अफगाणिस्तानमध्ये लपला आहे.

मिररला मिळालेल्या रिपोर्टनुसार, “हमजा बिन लादेन केवळ जिवंतच नाही तर अल-कायदाच्या उभारणीत सक्रियपणे सहभागी आहे. ही वस्तुस्थिती वरिष्ठ तालिबान नेत्यांना माहित आहे. हे नेते...त्याच्यासोबत जोडले गेले असून ते नियमित सभा घेतात आणि त्याला आणि त्याच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवतात. यातून अल-कायदा आणि तालिबान यांच्यातील निकटचा संबंध अधोरेखित होतो. ही पार्श्वभूमीवर पाश्चात्य सरकारांनी समजून घेणे महत्त्वाची आहे. हमजाने अल-कायदाचे नेतृत्व त्याच्या हाती घेतले आहे.”

Al Qaeda पुन्हा सक्रिय

“त्याच्या आदेशानुसार, अल-कायदा पुन्हा एकत्र येऊन सक्रिय होत आहे. तो पाश्चात्य देशांवर भविष्यात हल्ले करण्याची तयारी करत आहे. हमजा त्याच्या वडिलांचा वारसा पुढे सुरु ठेवण्याचा एक शक्तिशाली दृढनिश्चयाने अल- कायदा नेटवर्कमध्ये सक्रिय झाला आहे. यात हमजाचा भाऊ अब्दुल्ला बिन लादेन महत्त्वाची भूमिका बजावत आहे.” असेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

अफगाणिस्तान बनला जगातील सर्वात मोठा दहशतवादी हॉट स्पॉट

दुसऱ्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, शिबिरांत लढाऊ आणि आत्मघाती बॉम्बर्सना प्रशिक्षित केले जाते आणि त्यांना पाश्चात्य देशांमध्ये घातपात घडविण्यासाठी अफगाणिस्तानातून कसे बाहेर पडायचे? हे शिकवले जाते. असे मानले जाते की अफगाणिस्तानात २१ दहशतवादी नेटवर्क कार्यरत आहेत. यामुळे अफगाणिस्तान जगातील सर्वात मोठे दहशतवादी हॉट स्पॉट बनला आहे.

अल- कायदाची पाश्चात्य देशांवर हल्ल्याची तयारी

एका ताज्या मूल्यांकनानुसार, अल-कायदा इस्लामिक स्टेटशी संपर्क ठेवून कार्यरत आहे. यामुळे पश्चिमात्य देशांवर पुन्हा ९/११ सारख्या हल्ल्याच्या धोका वाढला आहे. हमजा बिन लादेनला दारा अब्दुल्ला खेल जिल्ह्यात (पंजशीरमध्ये) हलवण्यात आले आहे. जिथे ४५० अरब आणि पाकिस्तानी त्याचे रक्षण करत आहेत. "त्याच्या नेतृत्वाखाली अल कायदा पुन्हा एकत्र येत असून तो पाश्चात्य देशांवर भविष्यात हल्ले करण्याची तयारी करत आहे".

अयमान अल-जवाहिरीच्या नेतृत्वाखाली हमजाने घेतले दहशतवादी प्रशिक्षण

हा रिपोर्ट २०१९ मध्ये हमजा मारला गेला असल्याच्या दाव्याच्या विरुद्ध आहे. कारण त्यावेळी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात हमजा मारला गेला असल्याचे सांगण्यात आले होते. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल कायदाची कमान सांभाळणाऱ्या अयमान अल-जवाहिरीच्या नेतृत्वाखाली हमजाने दहशतवादी प्रशिक्षण घेतले असल्याचे मानले जाते आहे. २०१९ मध्ये त्याच्या मृत्यूचे वृ्त्त येण्यापूर्वी हमजाने अमेरिकेसह अनेक देशांवर हल्ले करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर अमेरिकेच्या हवाई हल्लात हमजा मारला गेल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. पण तो कधी मारला गेला आणि त्याला कुठे मारले गले हे सांगण्यात आले नव्हते. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडूनही याबाबत अधिक काहीही पुष्टी करण्यात आली नव्हती. दरम्यान, NMF च्या रिपोर्टने २०१९ च्या अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात हमजा मारला गेल्याच्या दावा फेटाळून लावला होता.

9/11 attack : ९/११ सारख्या हल्ल्याच्या तयारीत

खतरनाक दहशतवादी ओसामा बिन लादेनने ११ सप्टेंबर २००१ रोजीच्या दहशतवादी हल्ल्याने अमेरिकेला हादरवून सोडले होते. त्याने वर्ल्ड ट्रेड सेंटरसह अमेरिकेतील दोन सर्वात मोठ्या इमारतींवर हल्ला केला. त्यात सुमारे ३ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेनला २०११ मध्ये अमेरिकेने पाकिस्तानातील एबटाबादमध्ये कंमाडो घुसवून ठार केले होते. त्यानंतर २०१९ मध्ये ओसामाचा मुलगा हमजा बिन लादेन मारला गेल्याचे वृत्त समोर आले होते. पण आता तो जिवंत असल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण जगात दहशतवाद्या कारवाया करण्यासाठी सक्रिय झाल्याचे समजते.

हमजा बिन लादेन कोण आहे?

हमजा बिन लादेन याला "क्राउन प्रिन्स ऑफ टेरर" म्हणून ओळखला जात आहे. (Who is Hamza bin Laden) तो ओसामा बिन लादेनचा १५ वा मुलगा आहे. त्याला लहानपणापासूनच त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत दहशतवादी कारवायांसाठी तयार करण्यात आले आहे. हमजा हा अफगाणिस्तानात जाण्यापूर्वी इराणमध्ये नजरकैदेत होता. अमेरिकेने त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. २०११ मध्ये ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाला. आता त्याचा मुलगा हमजाने अल- कायदाचे नेतृत्व हाती घेतले असून तो ९/११ सारख्या हल्ल्याच्या तयारीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT