Nawaz Sharif on Operation Sindoor
इस्लामाबाद : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आणि भारताने सिंधू जल करार निलंबित केल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढत असताना, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सध्याचे पंतप्रधान व आपले बंधू शाहबाज शरीफ यांना राजनैतिक मार्गाने तणाव शमवण्याचा सल्ला दिला आहे. द एक्स्प्रेस ट्रिब्यूनने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भारताने सिंधू जल करार निलंबित केल्यानंतर नवाज शरीफ लंडनहून पाकिस्तानमध्ये परतले आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. त्यांच्या आगमनानंतर, नॅशनल सिक्युरिटी कमिटी (NSC) च्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नवाज शरीफ यांना दिली.
त्यानंतर नवाज यांनी सरकारला सल्ला दिला की, तणावाचा सामना आक्रमक पवित्रा घेऊन काम न करता, उपलब्ध सर्व राजनैतिक संसाधनांचा वापर करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत.
"द एक्स्प्रेस ट्रिब्यून" च्या रीपोर्टनुसार नवाज शरीफ आक्रमक धोरणाच्या विरोधात असून, त्यांनी पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (PML-N) आघाडी सरकारने शांतता स्थापनेसाठी डिप्लोमॅटिक पुढाकार घ्यावा, असे सांगितले आहे.
भारताशी चांगले संबंध ठेवण्यावर नवाज शरीफ यांचा पुन्हा भर
2023 मध्येही नवाज शरीफ यांनी भारताशी चांगले संबंध असणे आवश्यक असल्याचे ठासून सांगितले होते आणि असा दावा केला होता की कारगिल युद्धाला विरोध केल्यामुळेच 1999 मध्ये त्यांचे सरकार उलथवले गेले.
द न्यूज इंटरनॅशनलच्या रीपोर्टनुसार, नवाज यांनी असा आरोप केला होता की, "PML-N चांगले काम करत होते, तरीही आमचे सरकार वारंवार पाडण्यात आले."
"1993 आणि 1999 मध्ये माझे सरकार का पाडले गेले, हे मला जाणून घ्यायचे आहे. फक्त आम्ही कारगिल युद्धाचा विरोध केला म्हणून?" — असे नवाज यांनी विचारले होते. त्यांनी एकप्रकारे पाकिस्तानी लष्करालाच आव्हान दिले होते.
नवाज शरीफ यांनी 2023 मध्ये एका वक्तव्यात भारताशी 1999 मध्ये झालेला लाहोर करार पाकिस्ताननेच मोडला, अशी कबुली दिली होती.
"28 मे 1998 रोजी पाकिस्तानने पाच अणुचाचण्या केल्या. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी साहेब पाकिस्तानमध्ये आले आणि आम्ही करार केला. पण आम्ही तो करार मोडला. चूक आमच्याकडूनच झाली," असे नवाज शरीफ यांनी कबूल केले होते.
1999 च्या लाहोर करारात नवाज शरीफ आणि भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी शांती आणि स्थिरता राखण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मात्र, काही आठवड्यांतच पाकिस्तानी सैन्याने कारगिलमध्ये घुसखोरी केली, ज्यामुळे कारगिल युद्ध सुरू झाले.