इस्लामाबाद : गेल्यावर्षी भारत व पाकिस्तान दरम्यान झालेले चार दिवसांचे युद्ध हे दोन विचारसरणींमधील युद्ध होते, असे चिथावणीखोर वक्तव्य पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी रविवारी पुन्हा एकदा केले आहे. रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात मुनीर बोलत होते
मुनीर यांनी दावा केला की, मार्का ए हक (पाकिस्तानने या युद्धाला दिलेले नाव) दरम्यान पाकिस्तानची लष्करी रणनीती भारतापेक्षा सरस होती. भारताने 6 ते 10 मे 2025 दरम्यान पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले, ज्याला पाकिस्तानने चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, पाकिस्तानने 26 लक्ष्यांवर मारा केल्याचा दावा करताना त्यांनी कोणताही पुरावा सादर केला नाही.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले होते. भारताने स्पष्ट केले आहे की, ही कारवाई सीमेपलीकडील दहशतवादाला उत्तर देण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी होती.
भविष्यातील युद्धांसाठी पाकिस्तान अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पाणबुड्यांच्या मदतीने सज्ज आहेे. भारताने अमेरिकेमार्फत युद्धविरामाची मागणी केली होती, असाही दावा मुनीर यांनी केला. वस्तुत: पाकिस्तानने अमेरिकेचे अक्षरश: पाय धरून भारतीयांना थांबवण्याची याचना केली होती. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमधील थेट हॉटलाईन चर्चेनंतरच तणाव निवळल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.