आंतरराष्ट्रीय

Strait of Hormuz : तेलाच्या किमतींत उसळी; जागतिक ऊर्जा बाजार हादरला

पुढारी वृत्तसेवा

  • ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 106 डॉलरच्या पुढे गेली.

  • होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाज वाहतूक जवळपास ठप्प.

  • अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर धोका.

  • शेअर बाजारात घसरण; गुंतवणूकदारांमध्ये चिंता.

लंडन : अमेरिका आणि इराण यांच्यात होर्मुझ सामुद्रधुनीत वाढलेल्या तणावामुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. दोन्ही देशांनी व्यापारी जहाजांवर कारवाई केल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रेंट क्रूडची किंमत शुक्रवारी सकाळी प्रति बॅरल 106 डॉलरच्या पुढे गेली. ही वाढ जवळपास 5 टक्क्यांची असून, दोन आठवड्यांनंतर तेलाने पुन्हा 100 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे.

होर्मुझ मार्ग ठप्प; जागतिक पुरवठ्यावर संकट

जगातील सुमारे 20 टक्के तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा होर्मुझ सामुद्रधुनीतून होतो. मात्र सध्या या मार्गावरील जहाज वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. इराणने कोणत्या जहाजांना मार्ग द्यायचा याचा अधिकार स्वतःकडे असल्याचे सांगितले आहे, तर अमेरिकेने इराणी सागरी व्यापारावर निर्बंध आणले आहेत. बुधवारी केवळ 9 व्यापारी जहाजांनी या मार्गाचा वापर केला. यापूर्वी रोज सरासरी 129 जहाजांची ये-जा होत होती. त्यामुळे ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

ट्रम्प यांची कडक भूमिका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाला होर्मुझमध्ये माईन्स टाकणाऱ्या कोणत्याही इराणी नौकेचा नाश करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की, इराण करार करत नाही तोपर्यंत ही सामुद्रधुनी पूर्णपणे सील राहील. दरम्यान, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने दोन परदेशी मालवाहू जहाजे ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. यांमुळे परिस्थिती अधिक चिघळली आहे.

शेअर बाजारावरही परिणाम

तेलाच्या किमतीतील वाढ आणि संघर्षाच्या भीतीमुळे अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाली. एसअँडपी 500 निर्देशांक 0.41 टक्क्याने घसरला, तर नेस डॅक कॉम्पोझिटमध्ये 0.89 टक्क्याची घट नोंदली गेली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT